विशेष लेख: काँग्रेस का हरली? -किसे पता? का जिंकली? -क्या पता..? नकार यादी खूप मोठी
By अतुल कुलकर्णी | Updated: January 22, 2026 09:01 IST2026-01-22T09:01:22+5:302026-01-22T09:01:53+5:30
महाराष्ट्रात काँग्रेसकडे दमदार नेतृत्व नाही. दिशा नाही. आर्थिक बळ नाही. कोणाचा कोणाशी मेळ नाही. दिल्लीतून एकही बडा नेता इकडे फिरकला नाही.

विशेष लेख: काँग्रेस का हरली? -किसे पता? का जिंकली? -क्या पता..? नकार यादी खूप मोठी
अतुल कुलकर्णी, संपादक, लोकमत, मुंबई
महाराष्ट्रात अनेक वर्षे सत्तेवर असणारा काँग्रेस पक्ष महापालिका निवडणुकीत अत्यंत दयनीय स्थितीत आला आहे. कसेबसे साडेतीनशे नगरसेवक निवडून आले. इतक्या दारुण पराभवाचे आत्मचिंतन करण्याचाही विचार काँग्रेस नेत्यांमध्ये अजूनतरी दिसत नाही. नगरपरिषदेच्या वेळी काँग्रेसने नेत्यांना विभागवार जबाबदाऱ्या दिल्या होत्या. अमित देशमुख - मराठवाडा, बंटी पाटील - पश्चिम महाराष्ट्र, विजय वडेट्टीवार - विदर्भ, बाळासाहेब थोरात - उत्तर महाराष्ट्र, यशोमती ठाकूर-अमरावती, नसीम खान- कोकण आणि वर्षा गायकवाड - मुंबई अशी वाटणीही नेत्यांना करून दिली होती. मात्र, महापालिकेच्या वेळी अशा जबाबदारीचे वाटप झाले नव्हते, असे सांगत यातल्या अनेकांनी अपयशासाठी थेट प्रदेशाध्यक्षांकडे बोट दाखवले आहे.
मराठवाड्यात परभणी, नांदेड, लातूर आणि जालना महापालिका काँग्रेसकडे होत्या. त्यातली एकमेव लातूरची महापालिका काँग्रेसला मिळाली. त्याचे श्रेय भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे. त्यांनी विलासराव देशमुख यांच्याविषयीचे वादग्रस्त विधान केले नसते तर लातूरमध्ये भाजपला २२ पेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या. बंटी पाटील यांनी कोल्हापूरमध्ये एकाकी लढा दिला. इचलकरंजीत त्यांना यश आले नाही. सांगलीत विश्वजित कदम अपयशी ठरले.
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी घेतलेले निर्णय बदलण्याची ताकद काँग्रेस वर्किंग कमिटीकडे असते. त्या समितीत चार सदस्य महाराष्ट्रातले. त्यातल्या एकालाही महापालिकेत स्वतःची ताकद दाखवता आली नाही. खा. प्रणिती शिंदे यांना सोलापुरात यश मिळाले नाही. चंद्रकांत हंडोरे यांची मुलगी पराभूत झाली. नसीम खान यांचा मुलगा विजयी झाला. मात्र, कोकणात काँग्रेस औषधालाही उरली नाही. बाळासाहेब थोरात २९ महापालिकांपैकी २/३ ठिकाणी प्रचाराला गेले. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी असल्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांनी २६ सभा, ३३ पदयात्रा केल्या. बाकी नेत्यांनी पक्ष आणि पक्षाने कार्यकर्ते वाऱ्यावर सोडले. आर्थिक पाठबळ तर नाहीच नाही, मानसिक बळही काँग्रेसचे बडे नेते देऊ शकले नाहीत. प्रदेश काँग्रेसने फक्त झेंडे, बॅनर असे प्रचार साहित्य दिले. राज्य पातळीवरून कोणाला काही ‘रसद’ देण्याची क्षमता पक्षाकडे उरली नाही आणि तशी क्षमता असणारे नेते समोरच आले नाहीत.
आपापसातील मतभेद मिटवून, सगळ्यांना जबाबदारी देत पुढे नेणारा नेता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसमध्ये नाही. प्रत्येक नेत्याचे दुसऱ्या नेत्याशी भांडण आहे. ‘त्याला काय कळते?’ असे प्रत्येक नेत्याला दुसऱ्याविषयी वाटते. अनेक ठिकाणचे जिल्हाध्यक्ष प्रभारी तरी आहेत, नाहीतर निष्प्रभ तरी. भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एखादी गोष्ट सांगितली तर ती टाळून पुढे जाण्याची हिंमत राज्यातल्या एकाही नेत्यामध्ये नाही. काँग्रेसमध्ये असा एकही दमदार नेता नाही. महाराष्ट्रात काँग्रेस नेत्यांचा संघ कागदावर खूप मोठा आहे. प्रत्यक्षात सामना सुरू झाला की प्रत्येक जण ओपनिंग बॅट्समन म्हणून दुसऱ्याला कसे पुढे पाठवायचे यातच धन्यता मानत आला. पक्षाने ज्यांना वर्षानुवर्षं मंत्रिपदे दिली त्यांनी एकतर पक्षाकडे पाठ फिरवली किंवा स्वतःचे हात आखडते घेतले. पक्षसंघटना वाढवण्यासाठी कोणीही झोकून दिले नाही. दमदार नेतृत्व नाही. दिशा नाही. आर्थिक बळ नाही. कोणाचा कोणाशी मेळ नाही. देशपातळीवरचा एकही नेता महाराष्ट्रात प्रचाराला आला नाही. मुंबईत काँग्रेसने एकही सभा घेतली नाही. मोठ्या नेत्यांची सभा घ्यायची तर त्यासाठी काही लाखांचा खर्च येतो. तो कोणी करायचा म्हणून अनेकांनी सभाच लावल्या नाहीत. ही नकार यादी खूप मोठी आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या जिद्दीने राष्ट्रवादीसाठी लढा दिला, त्याच्या पाच-दहा टक्केही जिद्द काँग्रेसने दाखवली नाही. एखादा नेता लढला आणि पराभूत झाला तर त्याचे, त्याच्या लढण्याचे कौतुक तरी होते. काँग्रेसमध्ये लढायलाच कोणी तयार नव्हते तर कौतुक कोणाचे करायचे? मुंबईतील काँग्रेसच्या अपयशानंतर तत्काळ भाई जगताप यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांचा राजीनामा मागितला, तर त्यांनाच पक्षाने कारणे दाखवा नोटीस दिली. महाराष्ट्रात काँग्रेसचे इतके पानिपत झाले, त्यावर मात्र ना कोणाला नोटीस दिली गेली, ना कोणाकडे कसली विचारणा झाली. महाराष्ट्रातले दिल्लीत राहणारे काँग्रेसचे एक नेते मध्यंतरी भेटले. तुम्ही प्रचाराला येणार का? असे त्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘मला कोणी बोलावले तर येईन. मात्र, मीच स्वतःहून तुमच्याकडे येतो असे कसे म्हणू?’ महाराष्ट्रातल्या नेत्यांची ही अवस्था आणि भावना असेल तर दिल्लीतल्या नेत्यांना महाराष्ट्रात निवडणुका झाल्याचे तरी माहिती असेल का..? पक्षाचे प्रभारी रमेश चेन्निथला ‘मुंबई काँग्रेस स्वतंत्र लढणार’ एवढी घोषणा करून निघून गेले. त्याव्यतिरिक्त ना कोणी आले, ना गेले.. निवडणुका मात्र आल्या आणि गेल्या. जाताना उरलीसुरली काँग्रेसही गुंडाळून गेल्या.!
atul.kulkarni@lokmat.com