Grandpa .. you do rhythm heavy politics! | दादा.. तुम्ही लय भारी राजकारण करताव !

दादा.. तुम्ही लय भारी राजकारण करताव !

- सचिन जवळकोटे

प्रिय दादा...
गेले दोन दिवस तुम्ही भीमातीरी होता. काय तो तुमचा उत्साह. काय ती तुमची स्टाईल. थेट विरोधकांच्या घरी जाऊन त्यांना आपलंसं करण्याची काय ती तुमची व्यूहरचना. नुसतंच पंढरपूर नव्हे तर अख्खा सोलापूर जिल्हा ताब्यात घेण्याची काय तुमची ती धडपड. सारंच आश्चर्यकारक. धक्कादायक. दादा... तुम्ही लय भारी राजकारण करताव ! पण दादाऽऽ एक बोलू का ? इथली माणसंबी लय हुश्शाऽऽर. बारा गावचं पाणी पिऊन आलेल्यांना पाणी पाजण्यात माहीर. ‘बारामती झोन’खाली ‘सोलापूर महावितरण’चा कारभार चालवण्याएवढं सोप्पं नाय तेऽऽ.

तुम्हीच पालकमंत्री.. पण मंत्रीपद द्या !

हा जिल्हा ‘अकलूजकरां’चा की ‘सुशीलकुमारां’चा या संघर्षातच कैक दशकं गेली. नंतर हळूहळू तुमच्या ‘थोरल्या काकां’नी ‘निमगाव’च्या ‘शिंदेंची गढी’ अन्‌ ‘अनगर’च्या ‘पाटलांचा वाडा’ जवळ करून ‘अकलूजकरां’ना बाजूला सारलं. त्यात पुन्हा तुमचा चंचूप्रवेश झाला. तुमचा स्वतंत्र गट निर्माण झाला. आता तर इथले पालकमंत्रीही जणू तुम्हीच बनलात. यामुळं जिल्हा ‘थोरल्या काकां’चा की ‘धाकट्या दादां’चा याचा शोध तुमचेच कार्यकर्ते घेऊ लागलेत. 

अशात इलेक्शनच्या निमित्तानं तुम्ही ज्या पद्धतीनं सोलापूरचं राजकारण हॅन्डल करताय, त्यावरून तुमचा गट जरा जास्तच स्ट्राँग झाल्याची चर्चा. पंढरपूरच्या मंदिर समितीत ‘कमळ’प्रणित मंडळी भरली गेलीयत, म्हणून ती समितीच बदलायला तुम्ही निघालात.. पण या समितीत तुमच्याच सरकारमधले ‘संभाजी भाळवणीकर’ही आहेत की. हंऽऽ ते पंचायत समितीत ‘प्रशांतपंतां’सोबत असतात, हा भाग वेगळा. अशी तुमची कैक मंडळी आतून राजकीय भागीदारीत रमलेली. आता या साऱ्यांनाच ‘कमळ प्रणित’ म्हणून दूर सारणार की काय ?

इलेक्शनची सूत्रं सध्या  ‘संजयमामां’च्या फार्म हाऊसवरनं हलताहेत. होय. होय. तोच तो फार्म हाऊस. तुमच्या आवडत्या ‘उजनी’ धरणालगतचा. आता तर म्हणे ‘माढा अन्‌ करमाळा’ तालुक्यानंतर ‘पंढरपूर अन्‌ मंगळवेढा’ तालुक्यांसाठीही ‘मामां’च्या पीएंनी स्वतंत्र पीए ठेवलेत, प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीवर लक्ष ठेवण्यासाठी. परवा दिवशी फलटणचे ‘निंबाळकर’ खासदार गुपचूपपणे ‘कल्याणरावां’च्या घरी आलेले. ‘काळें’ची समजूत काढून त्यांना पुन्हा कमळाच्या पाकळ्यांमध्ये अडकविण्याची त्यांनी गुप्त मोहीम आखलेली. हे कळताच ‘संजयमामा’ थेट त्यांच्या घरी थडकले. ‘मामां’ना पाहताच सारेच दचकले. माढा लोकसभेतले दोन कट्टर दुश्मन एकमेकांसमोर आलेले पाहून ‘कल्याणरावां’नीही हळूच घाम पुसला. शेवटी कसंनुसं हसत ‘निंबाळकर’ निघाले. जाताना ‘संजयमामां’ना एवढंच म्हणाले, ‘आता तुम्हीच या आमच्याकडं. म्हणजे काळेंचा विषयच राहत नाही’.

हे ऐकून ‘मामा’ गालातल्या गालात हसले; कारण ते नेमके कुणाचे हे फक्त सत्तेतल्या खुर्चीलाच माहीत. आज तुम्ही ‘मातोश्री’सोबत सत्तेवर आहात म्हणून  ‘मामा’ तुमच्यासोबत. उद्या चुकून-माकून  पुन्हा ‘पहाटेचा शपथविधी’ करून ‘देवेंद्र नागपूरकरां’ची सत्ता आली तर हेच  ‘मामा’ कदाचित त्यांच्यासोबत. कारण त्यांनी गेल्या वर्षीच आमदार झाल्या-झाल्या डिक्लेर केलेलं की, ‘ज्यांची सत्ता.. त्यांच्यासोबत मी’. मग आलं का लक्षात..  लगाव बत्ती...

असो. वडाळ्याच्या ‘बळीरामकाकां’ना केवळ मिरविण्यापुरतं अध्यक्षपदावर बसवून पक्षाची अख्खी सूत्रं हलवू पाहणारे ‘उमेश नरखेडकर’ही तुमचे लाडके चेले. काय बोलतात राव टीव्हीवर. ऐकतच रहावं वाटतं. पण कॅमेऱ्यासमोर छानऽऽ छान बोलणं वेगळं अन्‌ ग्राऊंड लेव्हलला प्रत्यक्षात जनाधार असणं वेगळं, असं खुद्द त्यांचे शेजारी ‘अनगरकर’ सांगतात, त्याचं काय ? शेवटी ‘अनगरकरां’च्या बोलण्यात काहीतरी तथ्य असणारच नां; कारण ‘टीव्हीवरचा रिमोट’ अन्‌ ‘एका आमदारावरचा रिमोट’ यात जमीन-अस्मानाचा फरक कीऽऽ. लगाव बत्ती.

दादा.. आज सरकार तुमच्या ताब्यात. हा जिल्हाही तुमच्या कंट्रोलमध्ये रहावा म्हणून तुमची धडपड.. पण एकही मंत्रीपद तुम्ही या जिल्ह्याला दिलं नाही, ही खंत मनाला लागून राहिलेली. सलग सहावेळा निवडून येण्याचा विक्रम करणाऱ्या ‘बबनदादां’नाही तुम्ही का विचारात घेतलं नाही, हाही प्रश्न कार्यकर्त्यांसमोर पडलेला. बिबट्याला शोधायला तुमचे धाकटे ‘रोहितदादा’ करमाळ्याच्या माळरानावर अंधारात बॅटरीचा प्रकाश टाकतात; मात्र तुम्ही ‘लालबत्ती’चा प्रकाश काही अद्याप या जिल्ह्याला न दाखविलेला. आता तुमचे काही मंत्री घरी गेलेत. अजून किती जातील, कधी जातील हे ‘चंदूदादा कोथरूडकरां’नाच ठावूक. मात्र या साऱ्या बदलत्या परिस्थितीत सोलापूरचा विचार व्हायला हरकत नाही. एखादं तरी खातं द्या, हे सांगण्याची गरजही नाही.

असो. .सोलापूर शहराकडेही म्हणे तुम्ही आता जास्त लक्ष देऊ लागलात. गेली बावीस वर्षे आबदून-आबदूनही तुमचं घड्याळ कधी ‘बाळीवेस’च्या पलीकडं गेलंच नाही. निराळे वस्ती अन‌् लक्ष्मी-विष्णू चाळीबाहेर त्याचा ‘गजर’ कधी झालाच नाही. आता ‘तौफिकभाई’ अन्‌ ‘महेशअण्णां’ना सोबत घेऊन यंदाची महापालिका निवडणूक तुम्ही जोरात लढविणार आहात; पण याचं सर्वाधिक टेन्शन ‘देशमुखां’च्या वाड्यापेक्षा ‘ताईं’च्या बंगल्यावर जास्त पसरलंय बरं का.. लगाव बत्ती..

सोशल टच..

माऊली निघाली धाडसानं..

स्थळ : अशोक चौक परिसर. शनिवारच्या कडक संचारबंदीतही मोकळ्या रस्त्यावरून एक टू-व्हिलर सुसाट निघालेली. गाडी आई चालवू लागलेली.. तर वडील लहान मुलीला घेऊन मागं बसलेले. घरात खेळताना मुलीच्या नाकाला जखम झाल्यानंतर अंगावरच्या कपड्यानिशी तिघं आहे तस्सं  जीव धोक्यात घालून दवाखान्यात निघालेले. चौकात त्यांना पोलिसांनी अडविलंही. मात्र सिच्युएशन पाहून ‘खाकी’लाही माणुसकीचा पाझर फुटलेला. ‘कायदा कठोर असतो; मात्र तो शेवटी माणसांसाठीच असतो !’ याची जाणीव करून देणारी घटना. असो. या काळात स्वत:ला सांभाळा, लेकरांनाही सांभाळा ‘कर्फ्यू’ काळात बाहेर पडण्याची वेळ येऊ देऊ नका, हीच कळकळीची विनंती.

( लेखक 'लोकमत सोलापूर'चे निवासी संपादक आहेत.)

Web Title: Grandpa .. you do rhythm heavy politics!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.