होऊ घातलेल्या नगरसेवकांनो, या प्रश्नांची जाण आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 11:27 IST2026-01-02T11:26:25+5:302026-01-02T11:27:40+5:30
राज्यभरात महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना आपल्या शहरांच्या बिघडलेल्या ‘आरोग्या’बाबत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करणारे टिपण!

होऊ घातलेल्या नगरसेवकांनो, या प्रश्नांची जाण आहे?
डॉ. शाम अष्टेकर, सामाजिक वैद्यकशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक -
महाराष्ट्रात नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. चांगली शहरे आणि नागरिकांचे उत्तम आरोग्य हे कुठल्याही देशात चांगल्या अर्थ-राजकारणाचे फलित असते. महाराष्ट्रात सुमारे ५०-६० टक्के नागरी वस्ती आहे; परंतु आरोग्यसेवेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. नागरी आरोग्य व्यवस्थेचा हा एक लेखाजोखा :
१. मनुष्यबळाचा अभाव, सोयी-साधने कमी आणि एकूण अव्यवस्था असल्यामुळे फक्त गरीबवर्ग मनपाच्या दवाखान्यांचा थोडाफार उपयोग करून घेतो आणि इतर नागरिक मात्र खासगी सेवांकडे जातात. हे काहीअंशी तरी बदलले पाहिजे. शहरी दवाखाने आणि रुग्णालये राष्ट्रीय मानकांनुसार सुधारणे आवश्यक आहे. अर्थपुरवठा, मनुष्यबळ, प्रशासकीय अडचणी यावर मात केल्याशिवाय पर्याय निघणार नाही. केंद्र सरकारच्या नागरी आरोग्य योजनेअंतर्गत सुरू झालेली प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्येही अपेक्षित काम होत नाही. प्राथमिक सेवांपासून रुग्णालय व्यवस्था सुधारून मध्यमवर्गाने देखील इथे सेवा घेणे हा निकष धरला पाहिजे.
२. केंद्र शासनाच्या नागरी आरोग्य योजनेमध्ये सर्व सांसर्गिक आणि असांसर्गिक आजार नियंत्रण योजना, माता-बाल आरोग्य, लसीकरण इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी येतात. क्षयरोग, अतिसार, कावीळ आणि डास-रोग म्हणजे मुख्यत: डेंगू व चिकुनगुण्या आणि तापाच्या साथी ही महत्त्वाची आव्हाने आहेत. याचबरोबर अतिरक्तदाब, हृदयविकार, कर्करोग, मधुमेह, दमा, हे दीर्घकालीन घातक आजार मोठ्या प्रमाणात असतात; त्यांचे सर्वेक्षण चालू असते. या सगळ्यांना आरोग्यवर्धिनी/प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि पालिका रुग्णालयात विनाशुल्क उपचार अपेक्षित आहेत.
निदान ज्येष्ठ नागरिकांचा या आजारांवरचा मोठा खर्च वाचू शकतो. याशिवाय घरभेटी आणि संपर्कासाठी आशा उपलब्ध आहेत, आणि त्यांच्या नव्या नेमणूक होत आहेत, या सर्व व्यवस्थेचा चांगला उपयोग होणे आवश्यक आहे.
३. शालेय आरोग्य योजनेत मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी शिक्षण खाते, आरोग्यखाते आणि महिला बालकल्याण यांच्यामार्फत संयुक्तरीत्या योजना चालू आहेत; परंतु बऱ्याच शाळांमध्ये स्वच्छतागृहेदेखील धड नाहीत. माध्यान्ह भोजनाचा पोषक दर्जा सुमार आहे.
४. स्वच्छ भारत योजना आणि पिण्याचे सुरक्षित पाणी याबद्दल काही प्रगती झालेली आहे. तथापि, सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या लोकसंख्येच्या मानाने अल्प आहे. शहराच्या सीमांवर जास्त घाण आणि कचरा विखुरलेला दिसतो. महाराष्ट्रात बहुतेक शहरी नद्या आठ महिने बहुधा सांडपाणी वाहतात.
५. अन्नभेसळ प्रतिबंध कार्यक्रमात अन्न-निरीक्षक अधिकाऱ्यांची संख्याही कमी असते. हॉटेल्स आणि उपाहारगृहांबरोबरच खाद्यपदार्थ विकणाऱ्या हातगाड्यांचे समाधानकारक नियंत्रण अपेक्षित आहे.
६. मनपा क्षेत्रामध्ये ६०-७० टक्के वैद्यकीय सेवा खासगी क्षेत्रात असतात आणि त्यांच्या नियंत्रणासाठी बॉम्बे नर्सिंग होम रेगुलेशन ॲक्ट आहे. त्याचे उपनियम २०२१ मध्ये झाले आहेत. मेडिकल असोसिएशन आणि इतर संस्थांच्या मदतीने याबद्दल योग्य समन्वय करून नियम पारदर्शकपणे पाळण्याचा आग्रह दोन्ही बाजूंनी धरायला हवा. धर्मादाय रुग्णालयांना नियमावली आहे, त्यासाठी देखरेख आणि मार्गदर्शन हवे.
७. हवा-प्रदूषण ही नवीन समस्या अनेक शहरांना भेडसावत आहे. त्याचे मुख्य कारण वाढणारी वाहने. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या साहाय्याने पारदर्शकपणे यावर काम होणे अपेक्षित आहे.
८. नागरिकांचे आरोग्यवर्धन करणे एक महत्त्वाचे काम आहे. यासाठी चांगले हवा-पाणी, वाहतूक शिस्त, शालेय आरोग्य, नागरिकांना व्यायामाच्या सोयी, मुलांना खेळांच्या सोयी याबद्दल जागरूकता आणि अनेक आघाड्यांवर काम करावे लागते. यावर आज मनपाचा संस्थात्मक म्हणून फारसा प्रभाव नाही.
९. मनपाकडे जन्म-मृत्यू, शालेय आरोग्य तपासणी आणि इतर आजार-नियंत्रण या कार्यक्रमांमधून अनेकविध आरोग्य डेटा/विदा उपलब्ध होत असतो. प्रत्येक मनपाने यात लक्ष घालून आरोग्य विदा-संशोधन केंद्र तयार करून त्या आकडेवारीचा तात्काळ (रियल टाइम) उपयोग करून आरोग्य-वैद्यकीय व्यवस्थेला दिशा देण्याचा प्रयत्न करायला हवा.
१०. आज नगरसेवक निवडीनंतर व कमिट्या बनल्यानंतर आरोग्य आणि वैद्यकीय व्यवस्थेकडे फार तपशीलवार लक्ष जात नाही. नागरिकांचा आवाज देखील क्षीण आणि असंघटित असतो.
गैरकारभार आणि भ्रष्टाचार ही भारतातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये प्रमुख समस्या झाली आहे. त्याचे सोपे उत्तर नाही याची मला जाणीव आहे. तथापि, निवृत्त ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर्स आणि समाजातील इतर घटक सर्वांनी संघटितपणे यात लक्ष घालायला हवे, जिथे यश संभवते, असे मुद्दे सुरुवातीस निवडायला हवेत. अन्यथा, नागरी आरोग्याचा प्रश्न जास्तच विस्कळीत आणि विदारक होईल.
ashtekar.shyam@gmail.com