झोपडपट्टीधारकांना हक्काचा सातबारा, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 14:08 IST2026-01-07T14:05:58+5:302026-01-07T14:08:27+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेत आश्वासन

We will provide slum dwellers with legal land ownership documents and create employment opportunities for the youth says Devendra Fadnavis | झोपडपट्टीधारकांना हक्काचा सातबारा, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार

झोपडपट्टीधारकांना हक्काचा सातबारा, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार

धुळे : शहराचा चेहरामोहरा बदलून झोपडपट्टीधारकांना हक्काचा सातबारा देण्यापासून ते तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यापर्यंतचा रोडमॅप तयार आहे. धुळ्याला आधुनिकतेकडे नेण्यासाठी प्रयत्न करणार, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मनपा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवारी पांझरा काठी जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. या सभेला जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, संघटन महामंत्री विजय चौधरी, रवि अनासपूरे, आमदार अनुप अग्रवाल, आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम आमदार राम भदाणे, भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, रामकृष्ण खलाणे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार कुणाल पाटील, दोंडाईचा पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा नयनकुंवर रावल, शिरपूरचे नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, पिंपळनेरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा योगिता चौरे, ज्येष्ठ नेते हिरामण गवळी, माजी महापौर जयश्री अहिरराव, प्रतिभा चौधरी, चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, संजय शर्मा, डॉ. सुशिल महाजन, महादेव परदेशी, अल्पा अग्रवाल यांच्यासह भाजपाचे सर्व शहरातील विविध भागातील उमेदवार उपस्थित होते.

यांनी केला भाजपात प्रवेश

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत रामालय ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक गणेश मोरे, सिंधी समाजाचे नेते मणीशेठ डियालाणी व सचिन दहिते यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

यावेळी दोंडाईचा नगराध्यक्षा नयनकुंवर रावल, शिरपूरचे नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, पिंपळनेरच्या नगराध्यक्षा डॉ. योगीता चौरे यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

गोंदूर विमानतळ विस्तार आणि उद्योगांचे जाळे तयार 

जिथे विमानतळ असते, तिथे उद्योग आपोआप येतात. म्हणूनच धुळे विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम आम्ही पुढच्या टप्प्यात प्राधान्याने हाती घेणार आहोत. यामुळे धुळे हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे प्रगत प्रवेशद्वार ठरेल. यासाठी आगामी काळात केंद्र व राज्य सरकारच्या प्रयत्नातून विकास केला जाईल, असेही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही..

लोकसभा विधानसभा निवडणुका झाल्या की, लाडकी बहीण योजना बंद होईल अशी टिका विरोधकांकडून केली जात होती. परंतू जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही अशी ग्वाही दिली.

अतिक्रमणधारकांना मिळणार सातबारा... 

धुळ्यातील झोपडपट्टी धारकांना हक्काचा सातबारा उतारा मिळेल. एव्हढेच नव्हेतर त्यांना पक्की घरे देखील दिली जाणार आहे. यासह धुळे शहर स्वच्छ करण्यासाठी कचऱ्यावर प्रक्रिया केली जाईल. ७१७कोटी रुपयांतून भुयारी गटारी योजनाचे काम सुरु आहे. २० टक्के काम झाले आहे. उर्वरीत काम गतीने होईल असेही ते म्हणाले.

एमआयडीसीचा विस्तार, तरूणांना रोजगार 

रावेर एमआयडीसीतील तब्बल २ हजार एकर जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. डीएमआयसी प्रकल्पाचा दुसरा टप्पा आणि एमआयडीसीचा विस्तार या दोन्ही प्रकल्पांमुळे धुळ्यातील हजारो तरुणांना रोजगारासाठी बाहेर जावे लागणार नाही; त्यांना स्थानिक पातळीवरच मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.

धुळेकरांना पाणी देण्याचे स्वप्न पूर्ण होईल

२०१७ साली याच ठिकाणी मनपा निवडणुकीसाठी मी सभा घेतली होती. यंदा पुन्हा याचठिकाणी सभा घेत आहे. धुळ्यातील हद्दवाढीतील ११ गावांसाठी १४३ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना आणली आहे. त्यामुळे धुळेकरांना दररोज पाणी मिळणार, असे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
 

Web Title: We will provide slum dwellers with legal land ownership documents and create employment opportunities for the youth says Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.