सर्व पक्षांचे जाहीरनामे गुलदस्त्यात, यंदा पोकळ आश्वासन नकोत...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 13:05 IST2025-12-27T13:05:27+5:302025-12-27T13:05:27+5:30
धुळेकर मतदारांची सर्वच राजकीय पक्षांविरोधात आक्रमक भूमिका; विकास कामांची अपेक्षा

सर्व पक्षांचे जाहीरनामे गुलदस्त्यात, यंदा पोकळ आश्वासन नकोत...!
धुळे : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी अधिकृतपणे सुरू झाली असली, तरी राजकीय वर्तुळात अद्याप शांतता पसरलेली आहे. प्रमुख पक्षांनी आपली रणनीती आणि उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवल्याने 'जाहीरनामे' देखील रखडले आहेत. दुसरीकडे, मतदार आता केवळ पोकळ आश्वासनांवर समाधान न मानता आक्रमक भूमिका घेताना दिसत असून, उमेदवारांची कसोटी लागण्याची शक्यता आहे..
निवडून आल्यानंतर कोणते प्रश्न अथवा समस्या सोडवणार, कशाला ॥ प्राधान्य देणार याची माहिती नागरिकांना देण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करतात. परंतू अद्याप एकाही पक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही. त्यामुळे धुळेकर मतदारांनी शहरात सध्या सुरु असलेली विविध विकासकामे वेळेत पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहेत. तसेच २०१८ मध्ये झालेल्या निवडणूकीत सताधारी पक्षांनी दिलेल्या आश्वासनाची पुर्तता सात वर्षात न झाल्याने नाराजीही व्यक्त केली आहे.
केवळ कागदी घोडे नाचवू नका तर कृतीवर भर द्या
धुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ कागदी घोडे नाचवून चालणार नाही. तर प्रत्यक्ष कृतीवर भर देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात. शहरातील प्रदूषणाचे प्रश्न, ई-गव्हर्नन्स, सुसज्ज उद्याने आणि आधुनिक आरोग्य व्यवस्था यावर राजकीय पक्षांचे धोरण काय? हे समजून घेण्यासाठी धुळेकरांना उत्सुक आहेत. या संदर्भात ते अपेक्षा व्यक्त करत आहेत. अतिक्रमणाच्या विळख्यात रस्ते अडकले आहेत ते मोकळे कधी होणार?, ई-बस सेवा आणि पार्किंग धोरण, फेरीवाल्यांचे प्रश्न, शहरातील अस्वच्छता आदी प्रश्न सोडवावे अशी अपेक्षा आहे.
जाहीरनाम्यात स्वप्ने नकोत, मूलभूत सुविधा हव्यात
दरवेळी जाहीरनाम्यातून स्वप्ने दाखवली जातात. मात्र, आजचे चित्र पाहिले तर शहरात ठिकठिकाणी कचरा, आणि अर्धवट अवस्थेतील भुयारी गटार योजनेचे काम त्यासाठी खोदलेले रस्ते यामुळे नागरिक त्रस्त आहेत. शहरातील वाढते अतिक्रमण, मोकाट कुत्र्यांचा प्रश्न, हॉकर्स झोनचा प्रश्न या सर्व समस्या सोडविण्यासंदर्भात नवीन जाहीरनाम्यात उपाययोजना हवी, अशी अपेक्षाही धुळेकर मतदार पक्षांकडून करीत आहे.
धुळेकर मतदारांना हवे दररोज पाणी पुरवठा
शहरातील बहूसंख्य भागात आजही ४ ते ५ दिवसांआड पाणी मिळते. गेल्या पाच वर्षापासून केवळ एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे केवळ आश्वासनच मिळते. आतातरी नवीन वर्षात दररोज पाणीपुरवठा सुरु करावा. वरखेडी रोडवरील कचरा डेपोला वारंवार आग लागते, ज्यामुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरते. यामुळे जवळच्या वसाहतींमधील नागरिकांचा श्वास कोंडत आहे. रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि पार्किंगच्या सुविधेचा अभाव यामुळे आग्रा रोड, फूलवाला चौक आणि रेल्वे स्टेशन परिसरात मोठी वाहतूक कोंडी होते. अनेक भागांतील पथदिवे बंद अवस्थेत आहेत, ज्यामुळे रात्रीच्या वेळी महिला आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. शहरातील पाच कंदील मार्केटचा पुनर्विकास आणि व्यापारी संकुलांचे रखडलेले प्रकल्प हे देखील चर्चेचे विषय आहेत. हा प्रश्त तत्काळ सोडवावा अशी मागणी केली जात आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात काही लोकांचा बळी गेला आहे. त्यामुळे त्यांचाही बंदोबस्त हवा आहे.