मतदान करा आणि सवलत मिळवा; मनपाची 'व्होटर डिस्काउंट' संकल्पना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 12:29 IST2026-01-02T12:29:10+5:302026-01-02T12:29:10+5:30
मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांची नवी खेळी

मतदान करा आणि सवलत मिळवा; मनपाची 'व्होटर डिस्काउंट' संकल्पना
धुळे : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने शहरात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. केवळ शासकीय स्तरावरच नव्हे, तर लोकसहभागातून जनजागृती करण्यासाठी आयुक्त तथा निवडणूक अधिकारी नितीन कापडणीस यांनी आज महानगरपालिकेत शहरातील प्रमुख व्यापारी संस्थाप्रमुखांची विशेष बैठक घेतली. 'शाई दाखवा आणि सवलत मिळवा' या अभिनव संकल्पनेला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला आहे.
महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा म्हणून गुरुवारी शहरातील व्यापाऱ्यांची आयुक्त कार्यालयात मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
प्रशासनाची बहुआयामी जनजागृती मोहीम
केवळ बैठकांवर न थांबता, धुळे महानगरपालिका विविध पातळ्यांवर मतदारांपर्यंत पोहोचत आहे: विद्यार्थी सहभागः शाळा आणि महाविद्यालयांमध्ये निबंध, चित्रकला व वकृत्व स्पर्धाद्वारे युवा मतदारांना आकर्षित केले जात आहे. प्रत्यक्ष संपर्क: दिव्यांग बांधवांना निवडणूक विभागातर्फे प्रत्यक्ष भेटून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जात आहेत व त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित केले जात आहे. प्रभागांमध्ये रॅलीः प्रभागनिहाय रॅली आणि आकर्षक होर्डिंग्जच्या माध्यमातून शहरात निवडणुकीचे वातावरण निर्मिती केली जात आहे.
महापालिका प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
महापालिका क्षेत्रात जास्त मतदान व्हावे आणि लोकशाही बळकट व्हावी, या हेतूने राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
मतदारांसाठी महापालिकेची 'इन्सेंटिव्ह' योजना
निवडणूक प्रक्रियेत नागरिकांचा उत्साह वाढवण्यासाठी आयुक्तांनी व्यापाऱ्यांना एक विशेष आवाहन केले. त्यानुसारः मतदान करून आलेल्या ग्राहकाने हातावरील शाई दाखवल्यास, त्याला विशिष्ट कालावधीसाठी खरेदीवर विशेष सवलत (डिस्काउंट) दिली जाणार आहे. हॉटेलिंग, कपडा बाजार, सलून आणि जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर ही सूट लागू करण्याबाबत चर्चा झाली. या राष्ट्रीय कार्यात जे व्यापारी सहभागी होतील, त्यांची नावे महानगरपालिकेतर्फे सन्मानपूर्वक जाहीररित्या प्रदर्शित करण्यात येतील. बैठकीत निवडणूक प्रक्रियेच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपायुक्त मनोज वाघ, वसुली अधीक्षक मुकेश अग्रवाल, शिक्षण मंडळ समन्वयक गणेश सूर्यवंशी यांच्यासह इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मतदानाची टक्केवारी वाढवणे हे केवळ प्रशासनाचे काम नसून ते लोकचळवळ व्हावे, असा सूर या बैठकीत उमटला.
शहरातील व्यापाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद
बैठकीत शहरातील विविध क्षेत्रांतील नामवंत संस्थांनी सहभाग नोंदवला. यात प्रामुख्याने: गोल्डन लिफ रिसॉर्ट, डीमार्ट (प्रतिनिधी प्रशांत पवार), जुगल वस्त्रालय, हॉटेल गणपती पॅलेस, संगीता ड्रेसेस, तिरुपती सलून आणि रेलन क्लॉथ यांसारख्या प्रमुख संस्थांच्या प्रतिनिधींनी या मोहिमेत सहभागी होण्याची ग्वाही दिली.