धाराशिवमध्ये उद्धवसेनेचा राष्ट्रवादीवर आरोप, 'भाजपच्या हितासाठी स्वबळाची भूमिका'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 16:25 IST2025-11-26T16:21:12+5:302025-11-26T16:25:02+5:30
आघाडीवरून राष्ट्रवादी-उद्धवसेनेत जुंपली; उद्धवसेना-काँग्रेस वगळता इतर कोणत्याही पक्षांची आपसात दिलजमाई झाली नाही. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी, भाजप, शिंदेसेना स्वबळ आजमावत आहेत.

धाराशिवमध्ये उद्धवसेनेचा राष्ट्रवादीवर आरोप, 'भाजपच्या हितासाठी स्वबळाची भूमिका'
धाराशिव : धाराशिव नगरपरिषदेची निवडणूक आता रंगात येऊ लागली आहे. उद्धवसेनेच्या उमेदवारांचा प्रचाराचा नारळ सोमवारी फुटला. यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर भाजपच्या सांगण्यावरून आघाडी तोडल्याचा दावा खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी केला. त्यास राष्ट्रवादीनेही आपल्याकडे मेरिट असतानाही सन्मान राखला जात नव्हता, आता राजकारण बस करा, विकासावर बोला, असे प्रत्युत्तर देत ठिणगी टाकली.
धाराशिव नगरपरिषदेच्या अध्यक्ष व ४१ नगरसेवक पदांसाठी निवडणूक होत आहे. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसापर्यंत युती-आघाडीसाठी पक्षांमध्ये प्रयत्न सुरू होते. मात्र, उद्धवसेना-काँग्रेस वगळता इतर कोणत्याही पक्षांची आपसात दिलजमाई झाली नाही. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी, भाजप, शिंदेसेना स्वबळ आजमावत आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीत केवळ शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी झाली नाही. यावरून उद्धवसेनेने त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर निशाणा साधला. केवळ मतविभागणीसाठी भाजपच्या इशाऱ्यावर ही चाल चालली जात असल्याचे सांगत दोघांचाही हिशोब जनता मतदानातून करेल, असा दावा केला. यावर राष्ट्रवादीनेही जागावाटपाच्या तीन बैठका होऊनही पक्षाला सन्मानजनक जागा मिळत नसल्याने वेगळे लढण्याची भूमिका पक्षश्रेष्ठींच्या मान्यतेने घेतल्याचे म्हटले. राजकारण सोडून विकासावर बोलण्याचे आव्हानही त्यांनी उद्धवसेनेस दिले आहे.
जनता हिशोब करेल
अडीच वर्षे उपनगराध्यक्ष, काही काळ नगराध्यक्षपद व स्वीकृत नगरसेवकांच्या जागा राष्ट्रवादीला देण्याची भूमिका आम्ही मांडली होती. सर्व व्यवस्थित सुरू असताना कोणाच्या (भाजप) सांगण्यावरून ही भूमिका घेतली, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. जनता दोघांचाही २ नोव्हेंबरला हिशोब करेल.
-ओम राजेनिंबाळकर, खासदार, उद्धवसेना.
कमी जागा दिल्या
आमच्याकडे मेरिटचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असतानाही वाटाघाटीत हे पद उद्धवसेनेला सोडून दिले. त्याबदल्यात आम्ही अगदी शेवटच्या क्षणी ८ जागा मागितल्या. मात्र, ५ पेक्षा जास्त देण्याची त्यांची तयारी नव्हती. त्यामुळे स्वतंत्र भूमिका घेतली. त्यांनी आता विकासावर बोलून लढले पाहिजे.
- डॉ. प्रतापसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.)