प्रचाराच्या अंतिम टप्प्यात परंड्यात "अंधश्रद्धा" प्रवेशली, उमेदवारांच्या छायाचित्रांवर 'ब्लॅक मॅजिक'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 13:20 IST2025-12-01T13:19:19+5:302025-12-01T13:20:05+5:30
या धक्कादायक प्रकाराबद्दल अद्यापपर्यंत कोणीही अधिकृत तक्रार दाखल केली नाही व अद्याप गुन्हाही दाखल नाही.

प्रचाराच्या अंतिम टप्प्यात परंड्यात "अंधश्रद्धा" प्रवेशली, उमेदवारांच्या छायाचित्रांवर 'ब्लॅक मॅजिक'
- अविनाश इटकर
परंडा (जि. धाराशिव) : परंडा नगरपरिषदेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच, जादूटोण्याचा एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील एका प्रार्थनास्थळात प्रमुख उमेदवारांच्या छायाचित्रांचा वापर करून जादूटोणा करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत, मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते रात्री उशिरापर्यंत बैठका, कॉर्नर सभा घेऊन भेटीगाठी करत असताना, दुसरीकडे अंधश्रद्धेचा आधार घेतल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.
जादूटोण्यात लक्ष्य कोण?
जनशक्ती नगरविकास आघाडीच्या उमेदवारासह समर्थक नेत्यांच्या फोटोला सुया, दाभन टोचण करून काळ्या कपड्यांमध्ये बांधून ठेवले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
विकासाच्या मुद्द्याऐवजी भीतीचं वातावरण
परांडा पालिकेच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि जनशक्ती नगरविकास आघाडी यांच्यात थेट लढत आहे. गेल्या काही दिवसांपासून विकासाच्या मुद्द्यांवर जोरदार प्रचार सुरू होता. मात्र, जादूटोण्याचा हा गंभीर प्रकार रविवारी उघडकीस आला आहे.
अद्याप तक्रार नाही
नगरपरिषद निवडणूक रणधुमाळी सुरू असतानाच अंधश्रद्धेचा वापर केल्याने नागरिक धास्तावले आहेत. या धक्कादायक प्रकाराबद्दल अद्यापपर्यंत कोणीही अधिकृत तक्रार दाखल केली नाही व अद्याप गुन्हाही दाखल नाही.