'दुश्मन का दुश्मन, अपना दोस्त'; धाराशिवला शिंदे-ठाकरेंची सेना येणार एकत्र?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 12:01 IST2025-11-22T11:57:56+5:302025-11-22T12:01:03+5:30
धाराशिव पालिकेत एकत्र लढण्याची घोषणा भाजप व शिंदेसेनेच्या नेत्यांनी केल्यानंतरही अखेरच्या दिवशी युती तुटली.

'दुश्मन का दुश्मन, अपना दोस्त'; धाराशिवला शिंदे-ठाकरेंची सेना येणार एकत्र?
धाराशिव : अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्ह्यात मोठ्या नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. धाराशिव पालिकेत एकत्र लढण्याची घोषणा भाजप व शिंदेसेनेच्या नेत्यांनी केल्यानंतरही अखेरच्या दिवशी युती तुटली. भाजप येथून स्वतंत्र लढणार, हे निश्चित झाले. त्यामुळे शिंदेसेनेने भाजपवर पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला आहे. आता दुश्मन का दुश्मन, अपना दोस्त, या भूमिकेतून शिंदेसेना ठाकरेसेनेला टाळी देते का, याची उत्सुकता लागली आहे.
उस्मानाबाद विधानसभा क्षेत्रातील धाराशिव व कळंब नगर परिषदांच्या निवडणुका लागल्या आहेत. या दोन्ही ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढते आहे. भाजप व शिंदेसेनेत याठिकाणी युती झाल्याची घोषणा पालकमंत्री प्रताप सरनाईक, आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केली होती. त्यानुसार कळंबमध्ये अध्यक्षपद व २० पैकी १२ जागा शिंदेसेनेला सोडून भाजप ८ जागांवर लढत आहे. धाराशिवमध्ये अध्यक्षपद संमतीने भाजपला सोडण्यात आले. नगरसेवक पदासाठी रस्सीखेच सुरू होती. शिंदेसेनेने १७ उमेदवारांना एबी फाॅर्म दिले होते. भाजपने ४१ पैकी ३६ जागांवर आपले उमेदवार उतरवले आहेत. शेवटच्या दिवशी जागावाटपात बिनसल्याने भाजपने सर्वच जागांवर आपले उमेदवार कायम ठेवले. त्यामुळे शिंदेसेनेच्या उमेदवार व पदाधिकाऱ्यांचा चेहरा उतरला. आता कळंबमध्ये हे दोन्ही पक्ष हातात हात घालून, तर धाराशिवमध्ये एकमेकांना हात दाखवण्याच्या भूमिकेतून लढणार आहेत.
दुश्मन का दुश्मन, दोस्त
राजकारणात कधीच कोणी मित्र वा शत्रू नसतो. या तत्त्वानुसार मागची साडेतीन वर्षे एकमेकांविरुद्ध भांडणाऱ्या दोन्ही सेना एकत्र येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसेच, पालकमंत्री सरनाईकांचे उद्धवसेनेच्या लोकप्रतिनिधींशी सख्य असून, भाजपसोबत पटत नाही. त्यामुळे अध्यक्षपदासाठी शिंदेसेना ठाकरेसेनेला समर्थन देऊ शकते. मात्र, नगरसेवक पदाच्या लढतींचा एकमेव अडसर या चर्चेत असेल.
राष्ट्रवादीकडे टाकून ठेवला रुमाल
अजित पवारांची राष्ट्रवादी धाराशिवमधून स्वतंत्र लढत आहे. अध्यक्षपदासाठी त्यांनी उमेदवार दिला आहे. तर, शिंदेसेनेकडे आता अध्यक्षपदासाठी उमेदवार नाही. शिवाय, दोघांच्याही १७ जागांपैकी जवळपास १४ जागांवर ते आमने-सामने नाहीत. त्यामुळे येथे पाठिंब्याच्या चर्चेला स्कोप असून, तसा रुमाल २० तारखेलाच शिंदेसेनेने टाकून ठेवल्याची खात्रीशीर माहिती आहे.
उमरगा, परंडा व भूममध्येही आमनेसामने
भाजप व शिंदेसेना धाराशिव शिवाय इतर तीन ठिकाणी विरोधात उभी आहे. भूम व परंड्यात शिंदेसेनेच्या विराेधातील आघाडीत भाजप आहे. उमरग्यातही भाजपने शिंदेसेनेविरुद्ध दंड थोपटले आहेत.