सत्तेसाठी कुछ भी ! सकाळी सडकून टीका, सायंकाळी गोंजारले; नासुरांचेही जुळले सूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 18:00 IST2025-12-01T17:57:42+5:302025-12-01T18:00:01+5:30
एकमेकांच्या विरोधात भांडी आपटणारे पक्ष आले एकत्र

सत्तेसाठी कुछ भी ! सकाळी सडकून टीका, सायंकाळी गोंजारले; नासुरांचेही जुळले सूर
धाराशिव : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धाराशिवला अकल्पित अशा युती-आघाड्या तयार झाल्या आहेत. एरवी एकमेकांच्या विरोधात अद्वातद्वा बेसुरात भांडणारे पक्ष, नासूर संबोधणारे पक्ष आता ‘विकासा’चा कोरस गाऊ लागल्याने मतदारही अचंबित झाले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांसाठी निवडणुकीची प्रकिया सुरू आहे. महायुती व आघाडीसाठी वरवरचे प्रयत्न करून झाल्यानंतर राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांनी वेगळ्या चुली मांडल्या आहेत. त्यास पक्षश्रेष्ठींचीही उघड संमती मिळाली आहे.
राजकारणात काहीही अशक्य नसते, आजचा शत्रू उद्या मित्र बनू शकतो, हे वास्तव उमरगा, मुरूम, भूम, परंडा या नगरपरिषदांमध्ये झालेल्या आघाड्यांनी रणधुमाळीत उतरवले आहे. भूम व परंडा पालिकेत शिंदेसेनेचे आ. तानाजी सावंत यांनी विरोधकांच्या हालचाली टिपत स्वतंत्र चूल मांडली. त्यांचे समर्थक येथून एकटे लढत आहेत. तर त्यांच्याविरोधात उध्दवसेनेचे कार्यकर्ते नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत. त्यांना भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे बळ मिळाले आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी मशालीचे उपरणे खाली ठेवून पॅनल तयार करण्यात आले आहे. उमरग्यात आजवर एकमेकांचे कट्टर वैरी असलेल्या शिंदेसेना व काँग्रेसची ‘हात’मिळवणी झाली आहे. मुरूम पालिकेतही भाजपच्या विरोधात एरवी वैरभाव जपणारे इतर राजकीय पक्ष एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे.
शहरागणिक बदलले नेत्यांचे सूर...
उमरग्यात शिंदेसेना व काँग्रेसची युती भाजपविरोधात लढत आहे. तर कळंबमध्ये भाजप-शिंदेसेना एकत्र आहे. यामुळे नेत्यांसमोर विचित्र पेच आहे. उमरग्यात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी सायंकाळी भाजप नेत्यांवर सडकून टीका केली. यानंतर अवघ्या दोन तासांनी धाराशिवमध्ये झालेल्या सभेत मित्र म्हणून गोंजारले. कळंबलाही अशीच स्थिती आहे. भाजपच्या नेत्यांचीही या ठिकाणी अशीच पंचाईत झाली आहे.
महंतांची माघार कोणाच्या पथ्यावर?
तुळजापूर पालिकेची निवडणूकही सध्या गाजते आहे. ड्रग्स प्रकरणातील आरोपांची राळ उडवून आघाडी शर्यतीत आली आहे. दुसरीकडे मोठा मानमरातब असलेल्या महंत इच्छागिरी महाराजांनी उमेदवारी कायम असतानाही निवडणुकीतून माघार घेतल्याने मोठा ट्विस्ट निर्माण झाला. त्यांची माघार कोणाच्या पथ्यावर पडेल, याची समीकरणे जुळवण्यात राजकारणी व्यस्त आहेत.
व्हायरल डान्स अन् रीलवार...
धाराशिवच्या शहराच्या बकाल अवस्थेवर दोन्ही बाजूंनी ही स्थिती प्रतिस्पर्ध्यांनीच आणली, असे सांगणारे रील्स युद्ध उद्धवसेना व भाजपमध्ये सुरू आहे. सोबतच गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन्हीकडील पदाधिकाऱ्यांचे डान्स कसे उन्मादी होते, हे सांगण्याचीही शर्यत लागली आहे.