इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) पुढील मोसमासाठीची ट्रेड विंडो शुक्रवारी बंद झाली. प्रत्येक संघांनी रणनीतीनुसार अनेक खेळाडूंना कायम राखले, तर काहींना डच्चू दिले. या रिलीज केलेल्या खेळाडूंमध्ये काही मोठी नावही आहेत. त्यामुळे आता उत्सुकता लागलीय ती 19 डिसेंबरला कोलकाता येथे होणाऱ्या आयपीएल 2020च्या लिलावाची. आयपीएल ट्रेडमध्ये 11 खेळाडूंची अदलाबदली झाली. यात कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) संघानं रिलीज केलेल्या ऑस्ट्रेलियन फलंदाज ख्रिस लीननं मंगळवारी टी 10 लीगमध्ये वादळी खेळी केली. त्यानंतर KKRचा हा निर्णय चुकल्याचं मत व्यक्त केलं गेलं. टी 10 लीगमध्ये युवराज सिंग प्रतिनिधित्व करत असलेल्या मराठा अरेबियन्स संघाकडून लीननं ही खेळी साकारली. त्यामुळे लीनसाठी KKRचा मालक शाहरुख खान याच्याकडे शब्द टाकण्याची तयारी युवीनं दर्शवली आहे.


अरेबियन्स संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ख्रिस लीनला तुफान फटकेबाजी करूनही त्याला टी 10 लीगमध्ये पहिला शतकवीर बनण्याच्या मानापासून वंचित रहावे लागले. थोडक्यात त्याला तिहेरी धावांपासून दूर रहावे लागले. पण, त्यानं टी 10 लीगमधील सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम नावावर केला. त्याच्या खेळीनं संघाला मोठा विजय मिळवून दिला. लीन 30 चेंडूंत 9 चौकार व 7 षटकार खेचून 91 धावांवर नाबाद राहिला. त्यानं 303.33च्या स्ट्राईक रेटनं फटकेबाजी केली. या खेळीसह त्यानं 2018मध्ये अ‍ॅलेक्स हेल्सनं नोंगवलेला नाबाद 87 धावांचा विक्रम मोडला. दहा षटकांच्या स्पर्धेतील ही सर्वोत्तम खेळी ठरली.   

लीननं 26 चेंडूंत 82 धावा केल्या होत्या आणि अखेरच्या 18 चेंडूंत त्यानं शतकही पूर्ण केलं असतं. पण, त्याला अखेरच्या तीन षटकांत केवळ चार चेंडू खेळण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्याला टी10 मध्ये पहिला शतकवीर होण्याचा मान पटकावता आला नाही. इतकी जबरदस्त खेळी करणाऱ्या लीनला KKRनं रिलीज केल्यानं युवीनं आश्चर्य व्यक्त केलं. 2019च्या आयपीएलमध्ये KKRला प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यात अपयश आलं. पण, लीननं त्या मोसमात 13 सामन्यांत 405 धावा केल्या होत्या.  

लीनबद्दल युवी म्हणाला,''ख्रिस लीनला KKRनं संघात कायम का राखले नाही, हेच मला समजत नाही. चुकीचा निर्णय. याबद्दल मी शाहरुख खानला नक्की मॅसेज पाठवेन. आज लीननं दमदार खेळ केला. त्याला आयपीएलमध्ये खेळताना पाहणे, मी पसंत करेन. KKRला तो चांगली सुरुवात करून देऊ शकतो. ''

Web Title: Will text Shah Rukh Khan over Kolkata Knight Riders' ' bad decision' to release Chris Lynn: Yuvraj Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.