Virat Kohli will score how many ODI centuries? Wasim Jaffer predicts the magical figure | विराट कोहली वन डेत किती शतक झळकावणार? वसीम जाफरच्या उत्तरानं चकित व्हाल
विराट कोहली वन डेत किती शतक झळकावणार? वसीम जाफरच्या उत्तरानं चकित व्हाल

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात शतकी खेळी करताना कारकिर्दीतले 42वे शतक पूर्ण केले. त्याच्या या शतकाने अनेक विक्रम मोडले. कोहली वन डे क्रिकेटमधील महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडेल, असा विश्वास माजी कसोटीपटू वसीम जाफरने व्यक्त केला आहे.

 कोहलीचे हे 42वे शतक आहे आणि सचिन तेंडुलकरच्या शतकांशी बरोबरी करण्यासाठी त्याला सात शतकांची गरज आहे. त्याचे हे 67वे आंतरराष्ट्रीय शतक ठरलं, तेंडुलकर या क्रमवारीत 100 शतकांसह अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या रिकी पॉटिंगला मागे टाकण्यासाठी कोहलीला चार शतकांची गरज आहे. विराट कोहलीचे हे वेस्ट इंडिजविरुद्धचे 8 वे शतक आहे. केवळ सचिन तेंडुलकरला ( वि. ऑस्ट्रेलिया) एका प्रतिस्पर्धीविरुद्ध सर्वाधिक 9 शतकं करता आली आहेत. कोहलीनं विंडीजसह ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्याविरुद्ध प्रत्येकी आठ शतकं केली आहेत. तीन देशांविरुद्ध 8 किंवा त्यापेक्षा अधिक शतकं करणारा तो एकमेव फलंदाज आहे. 

या खेळीसह कोहलीनं वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये आठवे स्थान पटकावले आहे. त्यानं 11406 धावांसह भारताचा माजी कर्णार सौरव गांगुली ( 11363) चा विक्रम मोडला. भारतीय फलंदाजांमध्ये तेंडुलकरनंतर कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे.  कोहलीनं वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक 2032 धावा करण्याचा विक्रम नावावर केला. विंडीजविरुद्ध सर्वाधिक धावांचा जावेद मियादाँद यांचा 1930 धावांचा विक्रम त्याने मोडला.

कोहलीच्या या शतकानंतर जाफर म्हणाला,''11 डावानंतर कोहलीला शतक झळकावता आले आहे. पण, तो वन डे क्रिकेटमध्ये किमान 75-80 शतकं झळकावेल.'' 

भारताची मालिकेत 1-0 ने आघाडी
कर्णधार विराट कोहलीचे दमदार शतक आणि भुवनेश्वर कुमारने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर डकवर्थ लुईस नियमानुसार 59 धावांनी मात केली. या विजयासह भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 

भारताने दिलेल्या 280 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात अडखळती झाली होती. मात्र लुईस (65) आणि निकोलस पुरन (42) यांनी दमदार खेळ करत सामन्यात रंगत आणली. मात्र भुवनेश्वर कुमारने विंडीजची मधली फळी कापून काढत भारताचा विजय निश्चित केला. अखेरीस विंडीजचा संपूर्ण डाव 210 धावांत संपुष्टात आला. भारताकडून भुवनेश्वर कुमारने 4, शमी आणि कुलदीप यादवने प्रत्येकी दोन तर खलील अहमद आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी एक बळी टिपला. 

Web Title: Virat Kohli will score how many ODI centuries? Wasim Jaffer predicts the magical figure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.