Virat Kohli - Rohit Sharma face to face today | विराट कोहली - रोहित शर्मा आज समोरासमोर

विराट कोहली - रोहित शर्मा आज समोरासमोर

दुबई : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (आरसीबी) संघ इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) गतविजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध सोमवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत आपल्या वेगवान गोलंदाजीतील उणिवा दूर करण्यास प्रयत्नशील असेल. आरसीबीने स्पर्धेत विजयाने सुरुवात केली, पण किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध त्यांची फलंदाजी ढेपाळली. त्यांना ९७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. कर्णधार कोहली या लढतींमध्ये मोठी खेळी (१४ व १ धाव) करण्यात अपयशी ठरला. तो सोमवारच्या लढतीत खेळपट्टीवर जम बसविण्यास प्रयत्नशील राहील.

गोलंदाजीमध्ये युजवेंद्र चहल छाप सोडण्यात यशस्वी ठरला तर वेगवान गोलंदाजांमध्ये नवदीप सैनीचा अपवाद वगळता अन्य गोलंदाज धावा रोखण्यात अपयशी ठरले. भारतीय संघाचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील उपकर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाने पहिल्या लढतीतील पराभवानंतर शानदार पुनरागमन केले. संघाने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (केकेआर) शानदार कामगिरी केली. संघात अंतिम ११ मध्ये एक बदल होऊ शकतो तो म्हणजे सौरव तिवारीच्या स्थानी ईशान किशनला संधी मिळू शकते. गोलंदाजीमध्ये हार्दिक पांड्या व कि रोन पोलार्ड चांगले पर्याय आहेत, पण प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी स्पष्ट केले की, प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणाºया हार्दिककडून गोलंदाजी करण्याचा धोका पत्करण्याची आमची तयारी नाही.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Virat Kohli - Rohit Sharma face to face today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.