IPL 2025 च्या हंगामात आपल्या धमाकेदार खेळीनं १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी सगळ्यांसाठी चर्चेचा विषय बनला. राजस्थान रॉयलकडून खेळणाऱ्या वैभवनं अवघ्या ३५ चेंडूत १०० धावा केल्या, त्याच्या तुफान फटकेबाजीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. मात्र जागतिक क्रिकेट खेळणाऱ्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत शतक पटकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेत नापास झाल्याची चर्चा सोशल मिडियात सुरू झाली आहे. नेटिझन्सकडून व्हायरल होणाऱ्या या दाव्यात किती सत्य आहे हे जाणून घेऊया...
इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये गुजरात टायटन्सविरोधात खेळताना वैभव सूर्यवंशीने ३५ चेंडूत शतक झळकावले. त्याच्या या खेळीने सगळे रेकॉर्ड मोडले. वैभव भारताकडून या मालिकेत सर्वात वेगवान शतक करणारा पहिला खेळाडू बनला. गोलंदाजावर दबाव आणणारा वैभव शिक्षणाच्या दबावात असल्याचा दावा करण्यात येतो. नुकतेच CBSE चा निकाल जाहीर झाला. त्यात वैभव दहावीच्या परीक्षेत नापास झाला अशी बातमी व्हायरल झाली. परंतु यात अजिबात तथ्य नाही.
मोठमोठ्या गोलंदाजांची आयपीएलमध्ये धुलाई करून शतक ठोकणारा वैभव शिक्षणात झीरो आहे अशा मीम्स सोशल मीडियावर सीबीएसईच्या निकालानंतर व्हायरल होत आहेत. वैभव दहावीत नापास झाला, आता तो बोर्डाविरोधात डिआरएस घेणार, थर्ड अंपायर वैभवच्या पास किंवा फेलवर निर्णय देणार अशी खिल्ली उडवली जात आहे. परंतु वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाल्याची बातमी खरी नाही. कारण वैभवने दहावीची परीक्षा दिली नाही. वैभव सूर्यवंशी नववीत असल्याने तो दहावीच्या परीक्षेत नापास झाल्याचा दावा खोटा आहे.
आयपीएलमध्ये पदार्पण करणारा सर्वात युवा फलंदाज ठरलेल्या वैभव सूर्यवंशीने सुरुवातीच्या सामन्यांमध्येच आपल्यामधील प्रतिभेची चुणूक दाखवली. वैभव सूर्यवंशीने आयपीएलमधील पदार्पणातील सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकण्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर गुजरातविरुद्ध सामन्यात अवघ्या ३५ चेंडूत शतकी खेळी करत क्रिकेट जगतात एका नव्या विस्फोटक फलंदाजाचा उदय झाल्याचे संकेत दिले होते. वैभवने वयाच्या पाचव्या वर्षापासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. वैभव बिहारमधील डॉ. मुक्तेश्वर सिन्हा मॉडेस्टी स्कूल, ताजपूर या शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिकत होता. आता तो नववीत गेला आहे. आयपीएल २०२५ साठी झालेल्या लिलावामध्ये त्याला राजस्थान रॉयल्सने तब्बल १.१० कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केलं होतं.
Web Title: Vaibhav Suryavanshi, who scored a century in 35 balls, failed in 10th standard?; Know the truth behind the viral claim
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.