Vaibhav Suryavanshi Indian Cricket: रायझिंग स्टार आशिया कपमध्ये भारत अ संघाकडून खेळणाऱ्या वैभव सूर्यवंशीने आपली छाप सोडली. भारताच्या अवघ्या १४ वर्षीय खेळाडूने आपल्या फटकेबाजीने आणि खेळीने साऱ्यांनाच अवाक् केले. IPL मध्ये धमाका केल्यानंतर त्याने बहुराष्ट्रीय स्पर्धेतही आपल्या खेळाने साऱ्यांना प्रभावित केले. रायझिंग स्टार आशिया कप २०२५ मध्ये साखळी फेरीत वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत खेळलेल्या सामन्यामध्ये त्याने सर्वाधिक स्ट्राईक रेट राखला आहे. तसेच षटकारांच्या बाबतीतही तो नंबर १ आहे.
वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज कामगिरी
वैभव सूर्यवंशीने या स्पर्धेत आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. ३ सामन्यात एका शतकासह त्याने तब्बल २०१ धावा ठोकल्या आहेत. त्याने या स्पर्धेत खेळलेल्या सामन्यांमध्ये २४२.१६च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. शिवाय, स्पर्धेतील एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही वैभव सूर्यवंशीच्याच नावावर आहे. त्याने युएई विरुद्धच्या पहिल्या सामन्यात १४४ धावांची धमाकेदार खेळी केली होती.
षटकार मारण्यात वैभव सूर्यवंशी आघाडीवर
वैभव सूर्यवंशी आतापर्यंत स्पर्धेत षटकार मारण्यात आघाडीवर आहे. त्याने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांमध्ये एकूण १८ षटकार मारले आहेत. पाकिस्तानचा माझ सदाकत हा वैभव सूर्यवंशीपेक्षा मागे आहे. भारत अ संघाने रायझिंग स्टार्स आशिया कप २०२५ च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. वैभव सूर्यवंशीने संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. त्याच्या खेळीच्या बळावरच भारत अ संघाने उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे.