Uncertainty about Rohit, Ishant's Australia tour | रोहित, ईशांतच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत अनिश्चितता

रोहित, ईशांतच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत अनिश्चितता

नवी दिल्ली : भारताचा स्टार सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा व वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे उर्वरित दोन कसोटी सामन्यांतही त्यांच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. कारण बीसीसीआयच्या मते दोघांना मॅच फिट होण्यासाठी किमान महिनाभराचा कालावधी लागेल. दोन्ही खेळाडू सध्या बँगलोरमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) रिहॅबिलिटेशन प्रक्रियेत आहेत. या दोघांना शुक्रवारपासून प्रारंभ होत असलेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेत भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. त्यांना १७ डिसेंबरपासून प्रारंभ होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी कसोटी संघात स्थान देण्यात आले होते, पण विलगीकरणाच्या नियमांमुळे त्यांच्या उपलब्धतेबाबबत अनिश्चितता कायम आहे.

बोर्डच्या एका सूत्राने मंगळवारी सांगितले, एनसीएने एक अहवाल दिला असून त्यात रोहित व ईशांतला मॅच फिट होण्यासाठी तीन ते चार आठवडे लागणार असल्याचे म्हटले आहे.
रोहितने गेल्या आठवड्यात वृत्तसंस्थेसोबत बोलताना म्हटले होते की, त्याची हॅमस्ट्रिंगची दुखापत आता ठीक आहे. मॅच फिट होण्यासाठी एनसीएमध्ये मी केवळ ‘स्ट्रेंथ ॲण्ड कंडिशनिंग’ ट्रेनिंगवर लक्ष देत आहे.
दुसऱ्या बाजूचा विचार करता ईशांत साईड स्ट्रेनमधून सावरत आहे.
सूत्राने सांगितले, ‘जर ते प्रवास करणार असतील तर त्यांच्यासाठी विलगीकरणाचे नियम कडक असतील. कारण ते व्यावसायिक विमानाने प्रवास करतील. कठोर विलगीकरण म्हणजे त्यांना पूर्ण संघासोबत विलगीकरणाच्या १४ दिवसांच्या कालावधीत सराव करण्याची परवानगी राहणार नाही.’

आता केवळ क्रिकेट ऑस्ट्रेलियाच आपल्या सरकारची मनधरणी करीत त्यांना विलगीकरण कालावधीदरम्यान सरावाची परवानगी देऊ शकते. राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रविवारी म्हटले होते की, ‘हे दोन्ही खेळाडू जर या आठवड्यात ऑस्ट्रेलियात दाखल झाले तरच ते कसोटी मालिकेत खेळू शकतील.’

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Uncertainty about Rohit, Ishant's Australia tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.