Umesh Yadav to replace Jaspreet Bumrah? | जसप्रीत बुमराहचे स्थान उमेश यादव घेणार?

जसप्रीत बुमराहचे स्थान उमेश यादव घेणार?

अहमदाबाद : चौथा कसोटी सामना भारत आणि इंग्लंड यांच्यासाठी निर्णायक ठरणार आहे. या सामन्यासाठी संघ संतुलनाचा विचार आता सुरू झाला आहे. चौथ्या सामन्यासाठी भारतीय संघात दोन महत्त्वाचे बदल होऊ शकतात, असे चित्र आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर यांना स्थान देण्यात येणार नसल्याचे मानले जाते.


तिसऱ्या कसोटीत बुमराह आणि सुंदर हे दोघेही खेळले होते. मात्र, दोघांनाही गोलंदाजीची फार संधी मिळाली नाही. बुमराहने खासगी कारणास्तव बायोबबलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. बीसीसीआयने त्याला परवानगी दिल्यामुळे तो चौथी कसोटी खेळणार नाही. चौथ्या सामन्यात बुमराहच्या जागी उमेश यादव हा सर्वांत चांगला पर्याय असू शकेल. उमेशने काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयची फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली आहे. त्यामुळे बुमराहच्या जागी उमेश यादवला संघात स्थान मिळू शकते. सुंदरला वगळण्यात आले, तर त्याच्या जागी फिरकीपटू कुलदीप यादवला संधी मिळू शकते, असे संकेत आहेत. सुंदरला संघातून वगळले तर अजून एक फिरकीपटू संघात दाखल होऊ शकतो आणि तोच सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. त्यामुळे सुंदरच्या जागी आता कुलदीपचा विचार संघ व्यवस्थापन करीत आहे. कुलदीप दुसऱ्या कसोटीत खेळला, पण दोनपेक्षा अधिक गडी बाद करू शकला नव्हता. तिसऱ्या सामन्यात कुलदीपला वगळले होते. आता पुन्हा एकदा त्याला संघात स्थान मिळू शकते.

भारतीय खेळाडूंनी गाळला घाम...
n कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे, सलामीवीर रोहित शर्मा यांनी सोमवारी नरेंद्र मोदी स्टेडियममधील नेट्‌सवर जोरदार सराव केला. वेगवान आणि फिरकी गोलंदाजांविरुद्ध ड्राईव्ह, फ्लिक आणि पूलचे फटके मारत या खेळाडूंनी बराचवेळ घाम गाळला. मुख्य कोच रवी शास्त्री यांनी वरिष्ठ खेळाडूंसोबत चर्चा केली. त्यानंतर रोहित आणि कोहली यांनी आपसात चर्चा केली. तिसऱ्या कसोटीचा हिरो ठरलेला फिरकी गोलंदाज अक्षर पटेल याने सर्वोत्कृष्ट फलंदाजांना गोलंदाजी केली.

n क्षेत्ररक्षणाच्या सरावाच्यावेळी रोहित आणि रहाणे यांनी स्लिपमध्ये झेल घेण्याचा सराव केला. भारतीय संघाला पहिल्या सामन्यात २२७ धावांनी पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या सामन्यात मात्र भारताने इंग्लंडचा ३१७ धावांनी पराभव केला. मोटेराच्या फिरकीला पोषक खेळपट्टीवर पाहुण्यांना दोन दिवसांत दहा गड्यांनी चीत करीत भारताने दहा गडी राखून विजय साजरा केला होता. चौथी कसोटी येथे ४ मार्चपासून खेळली जाईल. चौथ्या सामन्याआधी भारतीय खेळाडूंनी कालदेखील सराव केला.

चौथ्या कसोटीतही 
फिरकीला अनुकूल खेळपट्टी!
n येथे ४ मार्चपासून खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटीतही फिरकीला अनुकूल खेळपट्टी तयार करण्यात येत असल्याचे संकेत मिळाले आहेत.
n गुजरात क्रिकेट संघटनेच्या एका अधिकाऱ्याने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली. हा अधिकारी म्हणाला,‘ मोटेरावर एकूण ११ खेळपट्ट्या आहेत. त्यापैकी पाच लाल मातीच्या तर सहा काळ्या मातीच्या खेळपट्ट्या आहेत. 
n तिसरी कसोटी पाच क्रमांकाच्या लाल मातीच्या खेळपट्टी झाली. सहा ते ११ व्या क्रमांकाच्या खेळपट्ट्या काळ्या मातीने तयार केलेल्या आहेत. मागच्या सामन्यात खेळपट्टीवर सुरुवातीपासून धूळ उडत होती. सहा सत्रात संपलेल्या या सामन्यादरम्यान खेळपट्टीवर काही ठिकाणी खड्डे पडले होते. 
n क्रिकेटच्या भाषेत काळ्या मातीच्या खेळपट्टीला ‘पाटा’तर लाल मातीच्या खेळपट्टीला ‘टर्निंग ट्रॅक’ असे संबोधले जाते. चौथा सामना सहा क्रमांकाच्या अर्थात काळ्या मातीच्या खेळपट्टीवर होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. 
n सध्या खेळपट्टीवर गवत असले तरी सामन्याच्या दिवशी ते दिसणार नाही. कडक ऊन आणि उकाड्यामुळे खेळपट्टीत टणकपणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मॅच रेफ्री जवागल श्रीनाथ हेदेखील रविवारी स्टेडियममध्ये दाखल झाले होते.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Umesh Yadav to replace Jaspreet Bumrah?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.