- अयाझ मेमन (कन्सल्टिंग एडिटर लोकमत)
भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची पुन्हा नियुक्ती होईल अशीच शक्यता वर्तविली जात होती. मात्र, या निर्णयप्रक्रियेबद्दल संशयाचे वातावरण निर्माण करण्यात आल्याबद्दल आश्चर्य वाटते. या निवड प्रक्रियेवर काही जणांनी टीका केली. ही प्रक्रिया म्हणजे कोडे सोडविण्यासारखे होते, असाही आरोप यावर करण्यात आला.
कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगस्वामी यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने घेतलेल्या निर्णयावर कोणीही टीका करु शकतो; मात्र शास्त्रींची निवड करताना ते कोणत्याही द्वेषाने पछाडलेले नसतील हे मात्र मी खात्रीने सांगू शकतो.
विशेष म्हणजे, भारतीय प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानी असलेल्या हेसनला मागे टाकत दक्षिण आफ्रिकेच्या रसेल डोमिंगोने बांगलादेशचे प्रशिक्षकपद पटकावले. यापूर्वी प्रशिक्षकांची नेमणूक थेट संघटनेतर्फेच केली जात असे. परंतु, क्रिकेटमध्ये आता अधिक पैसा आलेला आहे. टी-२० क्रिकेटच्या प्रसारामुळे प्रशिक्षक आणि त्याला मदत करण्यासाठीच्या कर्मचाऱ्यांचीही गरज निर्माण झाली आहे.
क्रिकेटच्या बाजारपेठेत सध्याच्या प्रशिक्षकांच्या कौशल्याला महत्त्व आलेले आहे. भारतासारख्या मोठ्या देशात अनेक क्रिकेट लीग सुरू आहेत. यातील खेळाडूंच्या कौशल्याला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षकांची गरज भासू लागली आहे.
सध्या प्रशिक्षकपदाला लाभलेली प्रतिष्ठा, पैसा यामुळे त्यांची निवड अत्यंत स्पर्धात्मक बनली आहे. यामुळेच या पदाची निवड प्रक्रिया शक्य तितक्या पारदर्शकतेसह अत्यावश्यक होते. जर सीओए-बीसीसीआयने शास्त्री यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असता, तर यावर टीका झाली असती. त्यामुळे अशी निर्णय प्रक्रिया दीर्घकालीन मूल्यासाठी अनिवार्य आहे.