Team India's 'super fan' Charulata Patel passes away | टीम इंडियाच्या ‘सुपर फॅन’ चारुलता पटेल यांचे निधन

टीम इंडियाच्या ‘सुपर फॅन’ चारुलता पटेल यांचे निधन

नवी दिल्ली : गेल्यावर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत चर्चेत आलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या सुपरफॅन चारुलता पटेल यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. पटेल यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर दिलेल्या माहितीनुसार पटेल यांनी सोमवारी वयाच्या ८७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. या पोस्ट मध्ये लिहिले आहे की,‘आमची आज्जी खूप सुंदर होती. ती नेहमी आनंदी असे. तुम्ही सर्वांनी गेल्यावर्षी त्यांच्या आयुष्यात खूप छान प्रसंग आणला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.’ 

इंग्लंडमध्ये गेल्यावर्षी झालेल्या भारत-बांगलादेश सामन्यादरम्यान व्हिलचेअरवर आलेल्या पटेल यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांच्यातील उत्साह पाहून कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार रोहित शर्मा यांनीही त्यांची भेट घेतली आणि संघाचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांचे आभार मानले होते.

बीसीसीआयने पटेल यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करताना ट्विट केले की, ‘भारतीय क्रिकेट संघाची सुपरफॅन चारुलता पटेल नेहमीच आमच्या हृदयात असतील. खेळाप्रती त्यांच्या उत्साह आमच्यासाठी प्रेरणादाई असेल. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.’

Web Title: Team India's 'super fan' Charulata Patel passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.