Rinku Singh Century In Ranji Trophy : आयपीएलस्पर्धेत धमाकेदार कामगिरी करुन दाखवत अल्पावधित टी-२० मध्ये फिनिशरच्या रुपात नावारुपाला आलेला रिंकू सिंहनं आता रेड बॉल क्रिकेटमधील धमाकेदार शतकी खेळीसह लक्षवेधून घेतलं आहे. रिंकू सध्या देशांतर्गत क्रिकेटमधील रणजी करंडक स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या संघाकडून खेळताना दिसत आहे. या स्पर्धेतील ५ व्या फेरीत कोयंबतूरच्या मैदानात रंगलेल्या तमिळनाडू विरुद्धच्या सामन्यात रिंकूनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कडक शतकी केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
२४८ चेंडूत १७ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने केल्या १७६ धावा
तमिळनाडू विरुद्धच्या सामन्यात रिंकून १५७ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने दमदार खेळी करत टी-२० चा स्टार या टॅगसह कसोटीत धमक दाखवण्याची क्षमता असल्याचे दाखवून देणारी खेळी केली आहे. यंदाच्या रणजी हंगामात त्याच्या बॅटमधून आलेली ही दुसरी शतकी खेळी आहे. याआधी त्याने आंध्र प्रदेशविरुद्धच्या सामन्यात १६५ धावांची खेळी केली होती. आता रिंकू सिंह याने २४८ चेंडूत १७ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने १७६ धावांची खेळी साकारली.
'नॅशनल ड्युटी'साठी रणजी स्पर्धेतील सामने सोडून ऑस्ट्रेलियाला गेला, पण...
आंध्र विरुद्ध शतकी धमाका केल्यावर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी-२० मालिकेमुळे तो काही रणजी सामन्याला मुकला. टी-२० मालिकेतही बहुतांश सामन्यात त्याला बाकावर बसावे लागले. शेवटच्या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली, पण पावसाच्या व्यत्ययामुळे शेवटचा सामना अनिर्णित राहिल्यामुळे त्याच्यावर बॅटिंगची वेळ आली नाही. आता रिंकू रणजीत धमाका करताना दिसतोय.
'फर्स्ट क्लास' कामगिरी
रिंकू सिंह याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी-२० पदार्पण केले आहे. पण कसोटीत अद्याप त्याला संधी मिळालेली नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याचा रेकॉर्ड एकदम झक्कास आहे. आतापर्यंत ५२ सामन्यातील ७४ डावात त्याने ५९ पेक्षा अधिकच्या सरासरीसह ३६३८ धावा केल्या आहेत. यात ९ शतके आणि २२ अर्धशतकांचा समावेश आहे.
तमिळनाडूच्या संघाकडून दोन 'शतकवीर'
या सामन्यात तामिळनाडूच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना बाबा इंद्रजीथ याने १८८ चेंडूत केलेल्या १४९ धावा आणि आंद्रे सिद्धार्थच्या २०५ चेंडूतील १२१ धावांच्या जोरावर ४५५ धावा केल्या. या दोघांशिवाय अजितेश गुरुस्वामी याने १५३ चेंडूत ८६ धावांची खेळी केली.