Srikanth Mundhe from Latur selected in KKR team | लातूरचा श्रीकांत मुंढे केकेआर संघात

लातूरचा श्रीकांत मुंढे केकेआर संघात

- महेश पाळणे /  संजीवकुमार देवनाळेलातूर / किनगाव : रणजी करंडक स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळताना अष्टपैलू कामगिरीने छाप सोडणाºया लातूरच्या श्रीकांत मुंढेने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर आयपीएलच्या १२ व्या हंगामासाठी आपली निवड पक्की केली आहे. केकेआर संघात श्रीकांतची निवड झाली असून, सहा वर्षांनंतर पुन्हा आयपीएल खेळण्याची संधी त्यास लाभली आहे.


लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील मूळचा किनगावचा असलेला श्रीकांत श्रीहरी मुंढे यास लहानपणापासूनच क्रिकेटची आवड. विविध वयोगटांत त्याने राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळताना दमदार कामगिरी केली आहे. रणजी क्रिकेट स्पर्धेत अनेक स्पर्धा त्याने महाराष्ट्राकडून खेळताना गाजविल्या आहेत. २०१९ मध्ये होणाºया १२ व्या आयपीएलच्या हंगामासाठी नुकताच लिलाव झाला. यात २० लाखांची बोली लावून केकेआर (कोलकाता नाईट रायडर्स) संघाने श्रीकांत मुंढेला आपल्या संघात स्थान दिले आहे. किनगावच्या एकता क्रिकेट क्लबच्या माध्यमातून श्रीकांतने आपल्या क्रिकेट करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. परभणी, नांदेडकडून प्रतिनिधित्व करीत राज्य स्पर्धेत त्याने अनेकवेळा अष्टपैलू कामगिरी केली आहे. मराठवाडा संघाचा तो कर्णधारही राहिला आहे. मुंबई येथे झालेल्या अंडर १३ क्रिकेट स्पर्धेत त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यानंतर त्याचा यशाचा आलेख उंचावतच गेला. पुण्याच्या डेक्कन जीमखाना देवधर क्लब व पुणा क्लबकडून खेळताना यश प्राप्त केले आहे. २०१२ साली त्याने सहारा पुणे वॉरियर्स संघाचे प्रतिनिधित्वही केले होते. त्यानंतर जवळपास सात वर्षांनी पुन्हा त्याला आयपीएल खेळण्याची संधी लाभली आहे. 


उत्तम परफॉर्म करण्याचे साधन... 
आयपीएलच्या १२ व्या सत्रात निवड झाल्याने आनंद झाला आहे. यावर्षी रणजी खेळलो नसलो तरी कामगिरीच्या आधारावर निवड झाली आहे. आयपीएलमुळे परफॉर्म करण्याचे उत्तम साधन मला मिळाले आहे. यातून भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी आपला प्रयत्न असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना श्रीकांतने सांगितले. 


दसका दम... 
इंग्लंडमध्ये झालेल्या पहिल्या लिव्हर पूल प्रीमियर लीग स्पर्धेत श्रीकांतने कोलवन बे संघाचे प्रतिनिधित्व करताना चार षटके निर्धाव टाकत ८५ धावांत १० बळी घेण्याचा विक्रम केला होता. त्याच्या या कामगिरीची देशभर चर्चा झाली होती. 


श्रीकांतची कामगिरी... 
रणजी स्पर्धेत सलग तीन वर्षे सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज. एमसीएने रणजी ट्रॉफी स्पर्धेत मॅचविनिंग परफॉर्मन्सबद्दलही त्यास २०१३-१४ साली गौरविले होते. यासह प्रीमियर लीग स्पर्धेत ६९ बळी घेणारा गोलंदाज ठरला. यासह ६ वेळेस पाच विकेट त्याने या स्पर्धेत पटकाविल्या होत्या. यासह फलंदाजीत १००० हून अधिक धावा त्याने पटकाविल्या होत्या. रणजी स्पर्धेतही अष्टपैलू कामगिरीने अनेकवेळा त्याने मैदान गाजविले आहे.

Web Title: Srikanth Mundhe from Latur selected in KKR team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.