९ बाद ३६ अशी अवस्था झाल्यानंतर टीम इंडियावर टीका करणारे शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) आणि शोएब अख्तर ( Shoaib Akhtar) आज कौतुकाचं ट्विट करत आहेत. मेलबर्न कसोटीतील अजिंक्य रहाणेचं शतकं, हनुमा विहारी-आर अश्विन यांची संयमी खेळी, शार्दूल ठाकूर-वॉशिंग्टन सुंदर यांची अष्टपैलू कामगिरी, मोहम्मद सिराज, टी नटराजन यांची छाप, रिषभ पंतची फटकेबाजी अन् चेतेश्वर पुजारा नावाची अभेद्य भींत... या सर्वांच्या जोरावर टीम इंडियानं ०-१ अशा पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारताना चार सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली. १९८८नंतर गॅबावर ऑस्ट्रेलियाला प्रथमच पराभूत करून टीम इंडियानं इतिहास रचला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाचे आता आफ्रिदी व अख्तर यांनी कौतुक केले आहे.
अॅडलेडवरील भारताच्या लाजीरवाण्या कामगिरीचे सोशल मीडियावर सर्वच वाभाडे काढत आहेत, त्यात पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनेही उडी मारली होती. त्यानं केलेलं ट्विट तुफान व्हायरल झाले होते. त्यानं ट्विट केलं होतं की,''मी उठलो तेव्हा मला स्कोअर ३६९ असा दिसला, त्यावर मला विश्वास बसला नाही. मी डोळे धुतले आणि पाहिलं तर काय, स्कोअर ३६/९ असा आहे.. त्यावरही विश्वास न बसल्यानं मी पुन्हा झोपी गेलो...''
गॅबावर टीम इंडियानं ३२८ धावांचे लक्ष्य ३ विकेट्स राखून पार केले. शुबमन गिलनं ९१ धावा आणि चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकी खेळीनं टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. रिषभ पंतनं नाबाद ८९ धावा करून विजयी कळस चढवला. भारताच्या या विजयानंतर शाहिद आफ्रिदीनं ट्विट केलं की, ''भारताची अश्विसनीय कामगिरी. दुखापतग्रस्त खेळाडूंची वाढत्या संख्येमुळे एकामागून एक धक्के बसल्यानंतरही भारतानं कमबॅक केलं आणि विस्मयकारक मालिका विजय मिळवला. भारतीय संघाचे अभिनंदन. दीर्घकाळ हा मालिका विजय लक्षात राहिल.''
''३६ ऑल आऊट ते मालिका विजय, वॉव,''असे अख्तरनं ट्विट केलं.