Saliva should be an option, otherwise ... | लाळेचा पर्याय असावा, अन्यथा...; जसप्रीत बुमराहने व्यक्त केली मोठी भीती

लाळेचा पर्याय असावा, अन्यथा...; जसप्रीत बुमराहने व्यक्त केली मोठी भीती

नवी दिल्ली : चेंडूवर लाळेचा वापर करण्यास बंदी आल्यामुळे अन्य पर्याय पुढे यायलाच हवा, अन्यथा क्रिकेटमध्ये फलंदाजांचे वर्चस्व निर्माण होईल, असे मत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने व्यक्त केले.


अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने कोरोनाच्या संकटामुळे चेंडूवर लाळेचा वापर करण्यास बंदी आणण्याची आयसीसीकडे शिफारस केली आहे. समितीने कृत्रिम पदार्थाच्या वापराची सूचना केली आहे. नव्या नियमांमुळे गोलंदाजांसाठी फार कठीण स्थिती होईल, अशी भीती व्यक्त करीत अनेक आजी-माजी गोलंदाजांनी लाळेसाठी पर्यायाची मागणी केली आहे.


आयसीसीच्या ‘इनसाईड आऊट’ या व्हिडिओ सिरिजमध्ये इयान बिशप आणि शॉन पोलाक यांच्याशी चर्चा करताना बुमराह म्हणाला, ‘बळी घेतल्यानंतर मैदानावर आनंद साजरा करताना गळाभेट घेणाºया गोलंदाजांपैकी मी नसल्याने ‘हाय फाईव्ह’चा माझ्यावर परिणाम होणार नाही, मात्र लाळेचा वापर करण्याची नेहमी उणीव जाणवत राहील. क्रिकेट सुरू झाल्यावर काय निर्देश येतील, हे माहीत नाही, पण माझ्या मते लाळेचा पर्याय पुढे यायला हवा. लाळेचा वापर चेंडूवर होणार नसेल तर हा खेळ फलंदाजांना अनुकूल होईल,असे वाटते.’


‘गोलंदाज हताश होतील. मैदानांचा आकार लहान होत आहे. विकेटदेखील ‘पाटा’ होत आहे. अशावेळी ‘स्विंग ’आणि‘ रिव्हर्स स्विंग’साठी चेंडूची चमक कायम राखायला लाळेचा पर्याय उपलब्ध व्हायला हवा,’असे मत बुमराहने व्यक्त केले. मागील काही वर्षांत परिस्थिती वेगवान गोलंदाजांना अनुकूल होती, असे वक्तव्य बिशपने करताना बुमराहने त्याच्या सुरात सूर मिळवला. (वृत्तसंस्था)


बुमराह म्हणाला, ‘कसोटी क्रिकेटमध्ये स्विंग आणि रिव्हर्स स्विंग मिळत असल्याने हा माझ्या पसंतीचा प्रकार आहे, त्याचवेळी टी-२० आणि वन डे प्रकारात अखेरच्या षटकांमध्ये चेंडू रिव्हर्स स्विंग होत नाही. सामना संपला की फलंदाज सांगतात, चेंडू स्विंग होत होता. पण हे घडणारच. आम्ही केवळ थ्रो डाऊन चेंडू टाकण्यासाठी मैदानात उतरत नाही.’ गेली दोन महिने गोलंदाजी करण्याचा अनुभव नसलेला बुमराह म्हणाला, ‘क्रिकेट सुरू होईल तेव्हा माझे शरीर कसे साथ देईल, हे सांगणे कठीण आहे. त्यादृष्टीने दीर्घकाळ गोलंदाजी करता यावी यासाठी आठवड्यात सहा दिवस फिटनेसचा सराव करीत आहे.’

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Saliva should be an option, otherwise ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.