India vs Australia, 4th Test Day 2 : भारताचा सलामीवीर रोहित शर्मा ( Rohit Sharma) याला चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टिकेचा सामना करावा लागत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोहित ४४ धावांवर माघारी परतला. फिरकीपटू नॅथन लियॉन याच्या चेंडूवर आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित मिचेल स्टार्कच्या हाती झेल देऊन माघारी परतला. रोहितच्या या आक्रमकपणाचा सुनील गावस्कर यांच्यासह अनेकांनी चांगलाच समाचार घेतला. ही कसोटी मॅच आहे, ट्वेंटी-20 नाही अशी आठवण त्याला अनेकांनी करून दिली. या टीकेकडे रोहित लक्ष देत नसून त्या फटक्याचे दुःख नसल्याचे त्यानं स्पष्ट केले.
दिवसाचा खेळ संपल्यानंतर रोहित म्हणाला,''तो फटका मारण्यासाठी मी योग्य फूटवर्क टाकले, परंतु चेंडू आणि बॅट यांचा ताळमेळ राखण्याचा प्रयत्न चुकला. मला तो चेंडू टोलवायचा होता. लाँग ऑफ आणि डीप स्क्वेअर लेग फिल्डरच्या मधून तो चेंडू काढायचा होता, पण जे हवं होतं, तसं मला करता आलं नाही. मला गोलंदाजावर दबाव वाढवायला आवडलं असतं आणि तेच माझं काम आहे.''
दरम्यान, या घाईनंतर सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी टीका केली. ते म्हणाले,''कशाला?, कशाला?, कशाला?; असा फटका मारण्याची गरजच काय. लाँग ऑन आणि डीप स्क्वेअर लेगला फिल्डर असताना असा बेजबाबदार फटका मारण्याची गरज नव्हती. काही वेळापूर्वीच तू चौकार खेचले होतेस, मग घाई कशाला?, तू संघातील सीनिअर खेळाडू आहेस, या बेजबाबदार फटक्यासाठी काहीच कारण खपवून घेतले जाणार नाही. ही विकेट गिफ्ट दिलीस.''
पावसामुळे दुसऱ्या दिवसाची ३५ षटकं वाया; टीम इंडिया ३०७ धावांनी पिछाडीवर
भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र गाजवले, परंतु सलामीवीरांनी पुन्हा निराश केलं. ऑस्ट्रेलियानं दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवून टीम इंडियाला बॅकफूटवर पाठवले. पावसानं संपूर्ण तिसरे सत्र वाया घालवले. त्यामुळे जवळपास ३५ षटकं आधी खेळ थांबवावा लागला. टीम इंडिया अजूनही ३०७ धावांनी पिछाडीवर आहे. शुबमन गिल धावफलकवर ११ धावा असताना माघारी परतला. रोहित व चेतेश्वर पुजारा या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या. रोहितनं ७४ चेंडूंत ६ चौकारांसह ४४ धावा केल्या. टीम इंडियाच्या २ बाद ६२ धावा झाल्या आहेत.