Yuvraj Singh Father Yograj Singh : "मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर

Yuvraj Singh father Yograj Singh emotional message: "ज्यांच्यासाठी मी अख्खं आयुष्य समर्पित केलं, तेच मला सोडून जातात, यावर मला विश्वास बसत नाही."

टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंग याचे वडील योगराज सिंग कायम आपल्या रोखठोक आणि खळबळजनक विधानांसाठी ओळखले जातात. युवराज सिंगचे क्रिकेट करियर संपल्यानंतर त्यांनी धोनीसारख्या क्रिकेटपटूवर उघडपणे टीका केली होती.

भारतीय संघ २०१९च्या विश्वचषक स्पर्धेत सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडशी हरला, त्यानंतर त्यांनी धोनीवर आगपाखड केली होती. ते म्हणाले होते की, धोनी जाणीवपूर्वक संथ खेळला कारण त्याला इतर कुठल्याही भारतीय कर्णधाराला वनडे वर्ल्डकप जिंकू द्यायचा नव्हता.

अशाप्रकारची खळबळजनक विधाने करणारे योगराज सिंग यांनी ताज्या मुलाखतीत एक धक्कादायक विधान केले आहे. मी आता एकटा पडलोय, अन्न-पाण्यासाठीही मला अनोळखी लोकांवर अवलंबून राहावं लागतंय, मी आता मरायला तयार आहे, असे वक्तव्य त्यांनी केलं आहे.

द विंटेज स्टुडिओशी बोलताना ते म्हणाले, "जेव्हा युवराज आणि त्याची आई शबनम मला सोडून गेले, तो एक भयानक धक्का होता. ही घटना अत्यंत वेदनादायी होती. ज्या स्त्रीसाठी मी अख्खे आयुष्य समर्पित केले, तीच मला सोडून जाते यावर मला विश्वास बसत नाही. मी केलेलं सारंकाही वाया गेलं."

"मी जेव्हा एकटा पडलो तेव्हा क्रिकेट आणि सिनेमा या दोन गोष्टींनी मला काही काळ साथ दिली, पण आयुष्यातील कुटुंबाची पोकळी भरून निघाली नाही. मी सतत एकटेपणाचा विचार करत असतो. मला आयुष्यात अनेक संधी मिळाल्या, पण माझं कुटुंब माझ्यापासून दूर गेलं याचं दु:ख आहे."

"माझ्या आयुष्यात जे काही घडलंय, ते मला मान्य आहे. माझ्या आयुष्यात जे सुरू आहे, ते पाहत मी आता सारंकाही देवावर सोडलंय. रोज नवा दिवस दाखवल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. मी आता एकटा पडलोय. त्यामुळे माझी कुणाकडूनही कसलीही अपेक्षा नाही."

"मी आता पूर्णपणे एकटा राहतो. कुटुंबातील कुणीही माझ्याजवळ नाही. घरात कामाला असलेले लोकही निघून जातायत. अन्नासाठी अनोळखी लोकांवर अवलंबून आहे, पण माझी काहीही तक्रार नाही. मला कुणालाही काहीही सांगायचं नाही. मी आता मरायला तयार आहे," असे ते म्हणाले.