धर्मशाला कसोटीत यशस्वी जैस्वाल ५ मोठे विक्रम मोडणार; विराट, द्रविड, गावस्कर यांना मागे टाकणार

India vs England 5th Test : भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता या मालिकेतील शेवटचा सामना ७ मार्चपासून धर्मशाला येथे होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याच्या बॅटीतून अनेक विक्रम रचले जाऊ शकतात.

२२ वर्षीय यशस्वीने या मालिकेत २ द्विशतकं झळकावली आहेत. त्याने विशाखापट्टणम कसोटीत २०९ धावांची खेळी खेळली होती. त्यानंतर राजकोट कसोटीच्या दुसऱ्या डावातही त्याने २१४ धावा केल्या होत्या. यशस्वी पुढील सामन्यात ५ मोठे विक्रम मोडू शकतो.

यशस्वी पुढील सामन्यात सुनील गावस्कर यांचा ५३ वर्ष जुना विक्रम मोडेल अशी अपेक्षा आहे. महान फलंदाज गावस्कर यांनी द्विपक्षीय कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा केल्या आहेत. १९७१ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटी मालिकेत त्याने खळबळ उडवून दिली. गावस्कर यांनी ४ कसोटी सामन्यांमध्ये विक्रमी ७७४ धावा ( ४ शतके आणि तीन अर्धशतकांसह द्विशतक) केल्या होत्या.

कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा हा भारतीय फलंदाजाचा विक्रम आहे. सध्याच्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत यशस्वीने आतापर्यंत ८ डावांत ६५५ धावा केल्या आहेत. यशस्वीने उर्वरित २ डावात १२० धावा केल्या तर तो द्विपक्षीय कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनेल.

यशस्वीकडे पुढील सामन्यात १ धावा करून विराट कोहलीचा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ६५५ धावा करणारा कोहली पहिला भारतीय आहे. यशस्वीने या बाबतीत त्याची बरोबरी केली आहे. आता तो १ धाव काढताच कोहलीचा हा विक्रम मोडला जाईल.

यशस्वी आणि विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत २ शतके झळकावण्याच्या बाबतीत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. त्याच्यासोबत सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांच्यासह आणखी ११ भारतीयांचा समावेश आहे. मोहम्मद अझरुद्दीन आणि राहुल द्रविड हे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक ३ शतकांच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहेत. द्रविडने दोनदा ही कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत पुढील कसोटीत २ शतके झळकावून सर्वांना मागे सोडण्याची सुवर्णसंधी यशस्वीकडे आहे.

यशस्वीने या मालिकेतील ४ सामन्यात एकूण २३ षटकार ठोकले आहेत. तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय ठरला आहे. एकूणच यशस्वी संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात ३४ षटकारांचा विक्रम वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू व्हीव्हीयन रिचर्डसन यांच्या नावावर आहे. यशस्वीला हा विक्रम मोडण्याची संधी आहे.

कसोटी सामन्यांमध्ये यशस्वीने आतापर्यंत १५ डावांमध्ये ६९.३५ च्या सरासरीने ९७१ धावा केल्या आहेत. जर त्याने या सामन्यात २९ धावा केल्या तर तो सर्वात जलद १००० कसोटी धावा करणारा दुसरा भारतीय ठरेल. या बाबतीत चेतेश्वर पुजाराला मागे टाकेल, ज्याने १८ डावात ही कामगिरी केली होती. भारतीयांमध्ये सर्वात जलद १००० कसोटी धावा करण्याचा विक्रम विनोद कांबळी (१४ डाव) यांच्या नावावर आहे.