फक्त ४ कसोटींत यशस्वी जैस्वालने जग इकडचं तिकडं केलं! रोहित, रिषभ, गिल यांना मागे टाकलं

ICC Test Batting rankings- भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal ) मैदान गाजवले आहे. दोन द्विशतकांसह मालिकेत सर्वाधिक ६५५ धावा करण्याचा पराक्रम त्याने केला आणि विराट कोहलीच्या एका मालिकेतील सर्वाधिक धावांच्या विक्रमाशी बरोबरी केली.

या कामगिरीच्या जोरावर यशस्वीने अनेक विक्रम नावावर केले आणि आयसीसीकडून त्याला याची पोचपावती मिळाली आहे. या कसोटी मालिकेपूर्वी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत ६९व्या क्रमांकावर असलेल्या यशस्वीने ताज्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आणि त्याने रोहित शर्मा, रिषभ पंत व शुबमन गिल यांना मागे टाकले.

हैदराबाद कसोटीत पराभव पत्करणाऱ्या भारतीय संघाने विशाखापट्टणम कसोटीत जबरदस्त पुनरागमन केले. त्याच्या २०९ धावांच्या खेळीने भारताला सावरले आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. राजकोटमध्येही त्याच्या नाबाद २१४ धावांनी भारताला आघाडीवर आणले आणि त्यानंतर रांची कसोटीतही त्याने ७३ व ३७ धावा केल्या.

ICC ने फेब्रुवारी महिन्याच्या प्लेअर ऑफ दी मंथ पुरस्काराची नामांकन जाहीर केली आणि त्यात यशस्वी जैस्वालचे नाव आहे. त्याच्यासमोर न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विलियम्सन व श्रीलंकेचा पथूम निसंका यांचे आव्हान आहे.

यशस्वीने या मालिकेतील ४ सामन्यात एकूण २३ षटकार ठोकले आहेत. तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय ठरला आहे. एकूणच यशस्वी संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात ३४ षटकारांचा विक्रम वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू व्हीव्हीयन रिचर्डसन यांच्या नावावर आहे. यशस्वीला हा विक्रम मोडण्याची संधी आहे.

या मालिकेपूर्वी कसोटी फलंदाजांमध्ये ५९व्या क्रमांकावर असलेल्या यशस्वीने ४ कसोटींत दमदार कामगिरी करून थेट १०व्या क्रमांकावर झेप घेतली. विराट कोहली ( ८) हा त्याच्या पुढे आहे. यशस्वीने रोहित शर्मा ( ११), रिषभ पंत ( १४ ) व शुबमन गिल ( ३१) यांना मागे टाकले.