Yashasvi Jaiswal, IPL 2023: मुंबईकर पोरगा... लय भारी! जैस्वालचा 'यशस्वी' पराक्रम; गिल, सॅमसनला टाकलं मागे

यशस्वी जैस्वालने ३५ धावाच केल्या तरीही केला धमाकेदार विक्रम

Yashasvi Jaiswal, IPL 2023 RR vs SRH: राजस्थानच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना दमदार कामगिरी केली. जॉस बटलर आणि संजू सॅमसन जोडीच्या भागीदारीच्या जोरावर राजस्थानने मोठी धावसंख्या उभी केली.

राजस्थानने २० षटकात २ बाद २१४ धावांपर्यंत मजल मारली. सवाई मानसिंग स्टेडियमवर टी२० सामन्यात झालेली ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली. जॉस बटलरचं शतक थोडक्यात हुकलं. त्याने ५९ चेंडूत ९५ धावा केल्या.

संजू सॅमसनने शेवटपर्यंत नाबाद राहत ६६ धावा केल्या. त्यात ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. आजच्या सामन्यात मुंबईकर यशस्वी जैस्वालला मोठी खेळी करता आली नाही, पण तरीही त्याने मोठा पराक्रम केला.

राजस्थान रॉयल्सचा स्टार युवा खेळाडू यशस्वी जैस्वालने आपल्या IPL कारकीर्दीत महत्त्वाचा टप्पा पार पाडला.

राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल मैदानात उतरताच गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने १८ चेंडूत ३५ धावा केल्या. कट शॉटच्या नादात तो झेलबाद झाला. त्याने ५ चौकार आणि २ षटकार लगावले. तरीही त्याने मोठा पराक्रम केला.

यशस्वीने आज IPLमध्ये चार आकड्यांचा टप्पा ओलांडला आणि स्पर्धेत 1,000 धावा पूर्ण केल्या. त्याला यासाठी 34 डाव लागले. ऋषभ पंतनंतर तो दुसरा सर्वात तरुण फलंदाज ठरला. याबाबतीत त्याने संजू सॅमसनला मागे टाकले. जैस्वालने 21 वर्षे 130 दिवसांत हा टप्पा गाठला होता. पंतने 20 व्या वर्षीच हा कारनामा केला होता.