रोहित शर्माच्या डिमांड! WTC Final च्या निकालासाठी ३ सामन्यांची मालिका; इंग्लंडच्या निवडीवर आक्षेप

WTC Final India vs Australia : भारतीय संघाला सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये पराभूत व्हावे लागले. २०२१मध्ये न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर भारताने दोन वर्षांत कसोटी क्रिकेट गाजवले, परंतु आज WTC Final मध्ये पुन्हा अपयश आले.

४४४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ २३४ धावांत तंबूत परतला आणि ऑस्ट्रेलियाने २०९ धावांनी विजय मिळवून ट्रॉफी जिंकली. पराभवानंतर रोहित शर्माने ( Rohit Sharma) पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.

भारताचा कर्णधार म्हणाला, आम्ही पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली नाही. आम्ही लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु काही चूकीचे फटके मारले. पुढच्या WTC Final मध्ये कोणता सर्वोत्तम खेळाडू असायला हवा याचा विचार करायला हवा. पुढच्या WTC सर्कलसाठी आतापासून विचार करणे महत्त्वाचे आहे.

संघात अनुभवी खेळाडू आहेत. यामध्ये दोन फायनल खेळणारे खेळाडूही आहेत. त्यांना कशी फलंदाजी करायची, हे तुम्ही शिकवू शकत नाही. खेळाडूंनी चांगली कामगिरी करायला हवी. फायनलमध्ये चूकीचे फटके अपेक्षित नाहीत, असेही रोहित म्हणाला.

रोहित पुढे म्हणाला, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल ३ सामन्यांच्या मालिकेसारखी असावी. एका सामन्याच्या निकालावर विजेता ठरवणे चुकीचे आहे. पुढच्या WTC Cycle मध्ये तीन सामन्यांची मालिका ही योग्य असेल. तसेच, WTC Finalसाठी जून हा एकमेव महिना असता कामा नये. शिवाय ती जगात कुठेही खेळवली गेली पाहिले, फक्त इंग्लंडमध्ये नको.

आम्ही चार वर्ष प्रचंड मेहनत घेतली... दोन फायनल खेळलो.. दोन वर्षांनी कसोटी चॅम्पियनशीप आली, परंतु एका पराभवामुळे तुम्ही दोन वर्षांच्या मेहनतीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. पुढच्या WTC साठी तयारीला सुरुवात करा, असे रोहित म्हणाला.