"तुझं बोट सुजलेलं असतानाही...", पती रहाणेची 'अजिंक्य' खेळी पाहून पत्नी राधिका भावुक

WTC Final 2023 IND vs AUS : सध्या इंग्लंडच्या धरतीवर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगला आहे.

इंग्लंडच्या धरतीवर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्यातील पहिले दोन दिवस भारतासाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे राहिले. नाणेफक जिंकूनही भारतीय संघाला सामन्यात पकड बनवण्यात अपयश आले.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने शानदार सुरूवात केली. ट्रॅव्हिस हेड (१६३) आणि स्टीव्ह स्मिथ (१२१) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर कांगारूंनी पहिल्या डावात ४६९ पर्यंत मजल मारली.

ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात १२१. ३ षटकांत ४६९ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ बळी घेतले, तर शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमी यांना प्रत्येकी २-२ बळी घेण्यात यश आले. याशिवाय रवींद्र जडेजाने एक बळी घेतला.

४६९ धावांचा डोंगर उभारल्याने ऑस्ट्रेलियन संघ मजबूत स्थितीत होता. अशातच कांगारूच्या गोलंदाजांनी देखील कमाल करत भारताच्या आघाडीच्या फलंदाजीला सुरूंग लावत सामना आपल्या बाजूने झुकवला.

पण ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना मराठमोळ्या जोडीने कडवी झुंज दिली. अजिंक्य रहाणे (८९) आणि शार्दुल ठाकूर (५१) यांनी डाव सावरला. त्यांच्या अप्रतिम खेळीमुळे फॉलोऑनचा धोका देखील टळला.

खरं तर इंग्लिश खेळपट्टीवर चेंडू सुरूवातीपासून उसळी घेत होता. पण भारताच्या फलंदाजीवेळी याचे प्रमाण अधिकच वाढल्याचे दिसले. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी याचा फायदा घेत भारतीय फलंदाजांना चीतपट केले.

दबावाच्या स्थितीत डाव सावरण्याची मोठी जबाबदारी अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर होती. रहाणेने देखील अप्रतिम खेळी करून 'अजिंक्य' लढतीत रंगत आणली. उसळी घेणाऱ्या चेंडूने रहाणेच्या हाताच्या बोटावर जोरदार हल्ला केला अन् त्याला जखमी केले.

अजिंक्यच्या बोटाला दुखापत असताना देखील त्याने ८९ धावांची खेळी केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याची पत्नी राधिका धोपावपकर हिने देखील आपल्या पतीचे कौतुक केले आहे.

राधिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट करत लिहले, "तुझे बोट सुजलेले असतानाही मानसिकता कायम ठेवण्यासाठी स्कॅन करण्यास नकार दिला आणि निःस्वार्थता, दृढनिश्चय दाखवत फलंदाजीवर लक्ष केंद्रीत केलेस. अटूट लवचिकता आणि वचनबद्धतेसह, खेळपट्टीवर टिकून राहून आम्हा सर्वांना प्रेरणा दिली. मला माझ्या जोडीदाराचा सदैव अभिमान वाटतो."

भारतीय संघाला आपल्या पहिल्या डावात अनेक समस्यांचा सामना करावा लागला. उसळी घेणाऱ्या चेंडूमुळे कोणत्याच भारतीय गोलंदाजाचा टिकाव लागत नव्हता. अशा स्थितीत शार्दुल ठाकूर आणि अजिंक्य रहाणे या जोडीने डाव सावरला.

पहिल्या डावात भारताने ६९.४ षटकांत सर्वबाद २९६ धावा केल्या. रहाणे-ठाकूर व्यतिरिक्त रवींद्र जडेजाने ४८ धावांची शानदार खेळी केली.