घे भरारी! इंग्लंडचं नाक ठेचून भारतीय संघाची WTC मध्ये अव्वल स्थानावर पकड मजबूत

India vs England 5th Test Live update : भारतीय संघाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडविरुद्ध ४-१ असा विजय मिळवला. धरमशाला येथे सुरू असलेल्या पाचव्या कसोटीत तिसऱ्याच दिवशी इंग्लंडचा निकाल लागला.

१००वी कसोटी खेळणाऱ्या आर अश्विनने ( R Ashwin ) डावात पाच विकेट्स घेऊन ऐतिहासिक कामगिरी करून विजयात सिंहाचा वाटा उचलला. पहिली कसोटी गमावल्यानंतरही ४-१ अशा फरकाने मालिका जिंकणारा भारता हा कसोटीत ११२ वर्षांनंतर पहिला संघ ठरला.

कुलदीप यादव ( ५-७२) व अश्विन ( ४-५१) यांनी इंग्लंडचा पहिला डाव २१८ धावांवर गुंडाळला. त्यानंतर रोहित शर्मा ( १०३) , शुबमन गिल ( ११०) यांची शतकं आणि यशस्वी जैस्वाल ( ५७), सर्फराज खान ( ५६) व देवदत्त पड्डिकल ( ६५) यांच्या अर्धशतकांनी संघाला ४७७ धावांपर्यंत पोहोचवले.

भारताने पहिल्या डावात २५९ धावांची आघाडी घेतली आणि इंग्लंडच्या दुसऱ्या डावात आर अश्विनने ( ५-७७) पाच धक्के दिले. इंग्लंडकडून जो रूट अर्धशतकी खेळी करून एकटा भिडला. इंग्लंडचा दुसरा डाव १९५ धावांवर गडगडला आणि भारताने एक डाव व ६४ धावांनी सामना जिंकला. जो रूट ८४ धावांवर बाद झाला.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दोन वेळा अंतिम फेरीत आलेल्या भारताने आज इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवून गुणतालिकेतील आपले स्थान आणखी मजबूत केले आहे. या विजयामुळे त्यांच्या खात्यात १२ महत्त्वाचे डब्ल्यूटीसी गुण जमा झाले आहेत आणि त्यांच्या एकूण गुणांची ७४ झाली. यामुळे त्यांची गुणांची टक्केवारी ६४.५८ वरून ६८.५१ वर पोहोचली आहे.

वेलिंग्टनमध्ये ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर घसरल्यानंतर रोहित शर्माच्या संघाने गेल्या आठवड्यात अव्वल स्थान गाठले. न्यूझीलंडची गुणतालिकेतील टक्केवारी ६० आहे, तर ऑस्ट्रेलिया ५९.०९ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.

इंग्लंड सलग चौथ्या पराभवामुळे आठव्या स्थानावर आहेत, त्यांच्या गुण टक्केवारीत घट झाली आहे. जे पूर्वीच्या १९.४४ वरून १७.५ पर्यंत खाली आहे. बांगलादेश ( ५०%), पाकिस्तान ( ३६.६६%), वेस्ट इंडिज ( ३३.३३%), दक्षिण आफ्रिका ( २५%) हे इंग्लंडच्या पुढे आहेत.