भारतीय क्रिकेटपटूंची अवस्था, धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का!; कंगना राणौतची जहरी टीका

राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटींनी पाठींबा दिल्यानंतर आता वेगळेच वळण घेतले आहे. बाहेरच्या व्यक्तींनी भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये नाक खूपसू नये असा पलटवार देशातील अनेक सेलिब्रेटींनी केली. त्यात महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar), विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, सुरेश रैना या क्रिकेटपटूंचाही समावेश आहे.

पण, क्रिकेटपटूंच्या या भूमिकेवर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतनं शंका उपस्थित केली आणि शेतकऱ्यांना पुन्हा दहशतवादी म्हणत क्रिकेटपटूंचे कान टोचले.

"भारताच्या सार्वभौत्मासंदर्भात कसल्याही प्रकराची तडजोड केली जाऊ शकत नाही. भारताच्या अंतर्गत बाबतीत बाहेरील शक्ती केवळ प्रेक्षक असू शकतात, ते याचा भाग होऊ शकत नाहीत. भारतातील नागरिक भारताला चांगले ओळखतात, यामुळे त्यांनीच भारतासंदर्भात निर्णय घ्यायला हवेत. देश एकसंध रहायला हवा, असे ट्विट सचिन तेंडुलकरने केले आहे. तसेच त्यांने आपल्या ट्विटमध्ये #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropaganda या हॅश टॅग्सचाही वापर केला आहे.

जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून, भारत आपले अंतर्गत प्रश्न शांततेने सोडवू शकतो, असे अनिक कुंबळे यांनी म्हटले आहे.

विराट कोहलीने लिहिलं आहे की, "मतभेदांच्या या काळात आपण सर्वजण एकत्र राहू या. शेतकरी हा आपल्या देशाचा अविभाज्य घटक आहे आणि मला खात्री आहे की सर्व बाजूंनी एक समाधानकारक तोडगा काढला जाईल जेणेकरून शांतता टिकेल आणि आम्ही सर्वजण पुढे जाऊ असं त्याने म्हटलं आहे.

सलामीवीर शिखर धवनने ट्विट करत म्हटलं आहे, “एका निष्कर्षापर्यंत पोहोचणे सध्या आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. उद्याच्या भविष्यासाठी आपण एकत्रीतपणे पुढे चालूया.

''देशानं एकत्र येऊन हा प्रश्न आज किंवा उद्या सोडवू, परंतु याचा अर्थ देशात फूट पडलीय असा होत नाही. चर्चेनं सर्व प्रश्न सुटतील,''असे सुरेश रैनानं ट्विट केलं.

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले की, भारताच्या आर्थिक जडणघडणीत कृषीक्षेत्राचे मोठे योगदान आहे. शेतकरी हे देशाचा पाठीचा कणा आहेत. हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे आणि तो चर्चेनं लवकरच सोडवण्यात येईल, अशी मला खात्री आहे.

अजिंक्य रहाणे म्हणाला की, आपण सर्व एकत्र उभे राहिलो तर सर्व प्रश्न सोडवले जाऊ शकतात. चला तर मग एकजूट राहूया आणि अंतर्गत प्रश्न सोडवण्याच्या दिशेनं काम करूया.

''हे सर्व क्रिकेटर त्यांची अवस्था धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का, अशी झाल्यासारखे का बोलत आहेत. देशात क्रांती घडवणाऱ्या कायद्याला शेतकऱ्यांचा विरोध का, हे ते का विचारत नाहीत. हे सर्व दहशतवादी आहेत... हे एवढ बोलायला घाबरताय कशाला?,''असं बॉलिवूड अभिनेत्रीनं ट्विट केलं.