मोहम्मद कैफ याच्यानंतर कोणाचा नंबर?

मोहम्मद कैफ याने नुकत्याच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. कैफने 12 वर्षांपूर्वी अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता आणि त्याला मैदानाबाहेर निवृत्ती जाहीर करावी लागली. कैफने 13 कसोटी आणि 125 वन डे सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. कैफव्यतिरिक्त अनेक खेळाडू बराच काळ भारताकडून सामना खेळलेला नाही. त्यामुळे त्यांनाही कदाचित कैफसारखीच मैदानाबाहेर निवृत्ती स्वीकारावी लागेल.

भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगने 40 कसोटी, 304 वन डे आणि 58 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने 2017 मध्ये वेस्ट इंडीजविरूद्ध अखेरचा वन डे , तर 2017 मध्येच त्याने इंग्लंडविरूद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता.

यशस्वी फिरकीपटू हरभजन सिंगने 103 कसोटी, 236 वन डे आणि 28 टी-20 सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. हरभजनने तीन वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध शेवटचा वन डे सामना खेळला आहे. 2015 मध्ये श्रीलंकाविरूद्धची कसोटी ही त्याची अखेरची आहे. टी -20 तही मागील दोन वर्ष तो संघाबाहेर आहे.

यशस्वी सलामीवीरांपैकी एक असलेल्या गौतम गंभीरने मागील पाच वर्ष भारताकडून वन डे सामना खेळलेला नाही. त्याने 2016 मध्ये इंग्लंडविरूद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्याने भारताकडून 58 कसोटी, 147 वन डे आणि 37 टी-20 सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहेत.

फिरकीपटू अमित मिश्रालाही मैदानाबाहेर निवृत्ती स्वीकारावी लागू शकते. त्याने 22 कसोटी, 36 वन डे आणि 10 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने डिसेंबर 2016 मध्ये अखेलचा कसोटी आणि त्याच वर्षी अखेरचा वन डे सामना खेळला होता.