Join us  

IRE vs WI: कुठे हसू तर कुठे अश्रू! आयर्लंडचा आनंद गगनात मावेना, पराभवानंतर वेस्ट इंडिजचे खेळाडू भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 2:42 PM

Open in App
1 / 8

ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. एकीकडे या स्पर्धेतील सराव सामने खेळवले जात आहेत, तर दुसरीकडे सुपर-१२ मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ८ संघ आमनेसामने आहेत. आज ब गटातील वेस्ट इंडिज आणि आयर्लंड यांच्यात सामना पार पडला. नवख्या आर्यलंडच्या संघाने शानदार विजय मिळवून विश्वचषकाचे तिकिट मिळवले आहे. तर दोन वेळचा विश्वचॅम्पियन वेस्ट इंडिजचा संघ आगामी टी-२० विश्वचषकातून बाहेर झाला आहे.

2 / 8

आज सुपर-१२ मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आयर्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामना पार पडला. नवख्या आयर्लंडच्या संघाने बलाढ्य वेस्ट इंडिजचा ९ गडी राखून पराभव करून विश्वचषकाचे तिकिट मिळवले आहे. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र संघाला आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवण्यात विंडिजच्या फलंदाजांना अपयश आले.

3 / 8

प्रथम फलंदाजी करताना विडिंजच्या संघाने २० षटकांत ५ बाद १४६ धावा केल्या. ज्याचा पाठलाग आयर्लंडच्या संघाने केवळ १ गडी गमावून १७.३ षटकांत पूर्ण केला. वेस्ट इंडिजकडून ब्रँडन किंग व्यतिरिक्त कोणत्याच फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. किंगने ४८ चेंडूत ६२ धावांची नाबाद खेळी करून आयर्लंडच्या गोलंदाजांविरूद्ध एकतर्फी झुंज दिली. आयर्लंडकडून गॅरेथ डेलनीने सर्वाधिक ३ बळी पटकावले. तर बॅरी मॅककार्थी आणि सिमी सिंग यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.

4 / 8

वेस्ट इंडिजने दिलेल्या १४६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडच्या फलंदाजांनी शानदार खेळी केली. सलामीवीर पॉल स्टर्लिंग आणि अँड्र्यू बालबर्नी यांनी सुरूवातीपासूनच आक्रमक खेळी करून विंडिजच्या गोलंदाजांवर दबाव टाकला. मात्र कर्णधार बालबर्नी २३ चेंडूत ३७ धावा करून बाद झाला. त्यानंतर सलामीवीर स्टर्लिंग याने ४८ चेंडूत नाबाद ६६ धावांची खेळी करून आयर्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. संघाच्या विजयात यष्टीरक्षक फलंदाज लॉर्कन टकर याने ४५ धावांची नाबाद खेळी करून मोठा हातभार लावला. वेस्ट इंडिजकडून अकेल हुसैन व्यतिरिक्त कोणत्याच फलंदाजाला बळी घेण्यात यश आले नाही.

5 / 8

वेस्ट इंडिज सारख्या २ वेळच्या विश्वचॅम्पियन संघाला पराभवाची धूळ चारल्यानंतर आयर्लंडच्या खेळाडूंनी मोठा जल्लोष केला. सामना पार पडताच सर्व खेळाडूंनी मैदानावर येऊन प्रेक्षकांचे आभार मानले. राउंड फेरीमध्ये आयर्लंडचा संघ ब गटात होता. या फेरीतील ३ सामन्यांमध्ये २ विजय मिळवून आयर्लंडच्या संघाने विश्वचषकात स्थान मिळवले आहे. ब गटात आयर्लंड ४ गुणांसह सध्या अव्वल स्थानी विराजमान आहे.

6 / 8

२ वेळच्या विश्वचॅम्पियन वेस्ट इंडिजच्या संघाला राउंड फेरीतील ३ पैकी एकच सामना जिंकता आला. त्यामुळे त्यांना विश्वचषकाला मुकावे लागले आहे. वेस्टइंडिजला त्यांच्या पहिल्या सामन्यात स्कॉटलंडने पराभवाची धूळ चारली होती. त्यानंतर विंडिजच्या संघाने जोरदार पुनरागमन केले आणि झिम्बाब्वेचा पराभव करून विश्वचषकात पोहचण्याची आशा कायम ठेवली होती. मात्र त्यांच्या या आशेवर आयर्लंडच्या संघाने पाणी टाकले.

7 / 8

नवख्या संघाकडून मोठा पराभव झाल्यानंतर वेस्ट इंडिजचे खेळाडू भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. वेगवान गोलंदाज जेसन होल्डरच्या चेहऱ्यावर दु:ख स्पष्टपणे दिसत आहे. वेस्ट इंडिजकडून ब्रँडन किंग व्यतिरिक्त कोणत्याच फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही आणि म्हणूनच आयर्लंडचा विजय सोपा झाला.

8 / 8

खरं आतापर्यंत राउंड फेरीतील ३ संघानी विश्वचषकाचे तिकिट मिळवले आहे. यामध्ये आशियाई चॅम्पियन श्रीलंका, नेदरलॅंड आणि आयर्लंडच्या संघाचा समावेश आहे. तर झिम्बाब्वे आणि स्कॉटलंड यांच्यात होणाऱ्या सामन्यानंतर चौथा संघाचे चित्र स्पष्ट होईल. झिम्बाब्वे आणि स्कॉटलंड यांच्यात विजयी होणारा संघ ६ नोव्हेंबर रोजी भारताविरूद्ध सामना खेळेल.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२आयर्लंडवेस्ट इंडिजझिम्बाब्वेश्रीलंका
Open in App