विराट-BCCI वादावर शाहिद आफ्रिदी म्हणतो, "क्रिकेट बोर्ड हे वडिलांच्या स्थानी..."

भारतीय संघाच्या कर्णधारपदावरून सध्या विराट कोहली आणि बीसीसीआयमध्ये तू तू-मैं मैं सुरू असल्याचं दिसतंय.

Virat Kohli vs BCCI Captaincy Controversy : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आणि त्यासोबतच भारताचा एकदिवसीय संघाचा कर्णधारही बदलल्याची घोषणा बीसीसीआयने केली. विराट कोहलीला पदावरून दूर करत रोहित शर्माला टी२० पाठोपाठ एकदिवसीय संघाच कर्णधारपदही देण्यात आले. त्यामुळे विराट आणि बीसीसीआय यांच्यात वाद असल्याची चर्चा रंगली.

या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी आधी विराट कोहलीने आणि नंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने पत्रकार परिषद घेतली. पण या दोन पत्रकार परिषदांनंतर परिस्थिती अजूनच चिघळली. विराट आणि संघनिवड समिती यांच्या सारं काही आलबेल नसल्याचं यातून दिसून आलं.

विराटच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर फॅन्समंडळी उभी राहिली. अनेक क्रिकेट जाणकारांनी या वादावर मत व्यक्त केलं. त्यातच आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यानेही या विषयावर रोखठोक मत मांडलं.

पाकिस्तानचा धडाकेबाज माजी फलंदाज शाहिद आफ्रिदी एका वाहिनीशी संवाद साधत असताना त्याला विराट-BCCI वादावर विचारण्यात आले. तेव्हा तो म्हणाला, "घडलेला प्रकार थोडासा संवदेनशीलतेने हाताळता आला असता. मला वाटतं की क्रिकेट मंडळाची भूमिका खूप महत्त्वाची असते. कारण खेळाडूंसाठी ते वडिलांच्या स्थानी असतं."

"क्रिकेट बोर्डाच्या मनात खेळाडूसाठी ज्या काही भविष्यातील योजना असतील त्याबद्दल त्यांनी खेळाडूला विश्वासात घेऊन सांगणं महत्त्वाचं आहे. 'आम्हाला खेळाडू म्हणून तुझ्याकडून या अपेक्षा आहेत. तुझे भविष्यातील प्लॅन्स काय आहेत", असा थेट प्रश्न बोर्डाने विचारला पाहिजे", असंही तो म्हणाला.

"बोर्ड म्हणून आम्ही या खेळाडूकडून असा खेळ अपेक्षित ठेवला आहे आणि त्याचे हे-हे फायदे आहेत, असं स्पष्टपणे त्यांनी खेळाडूला सांगायला हवं", असं आफ्रिदीने नमूद केलं.

"तुम्ही सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत बसलात तर त्यातून गैरसमज होणं स्वाभाविकच आहे. त्यापेक्षा बोर्ड आणि खेळाडू यांच्यात समोरासमोर बसून संवाद होणं महत्त्वाचं आहे", असा मोलाचा सल्ला त्याने दिला.

"या गोष्टी अशाच खेचल्या गेल्या तर त्याच्यावर कधीच तोडगा निघणार नाही. त्यामुळे बोर्ड आणि खेळाडू यांच्यातील संवादात कधीही अंतर राहू नये असं मला स्पष्ट वाटतं", असंही आफ्रिदी म्हणाला.

"पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि खेळाडू यांच्यातही कायम संवाद असायला हवा असं मला वाटतं. आणि केवळ पाकिस्तान क्रिकेट बोर्डच नव्हे तर सर्वच क्रिकेच बोर्डांनी सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी", असंही मत आफ्रिदीने व्यक्त केलं.