विराट कोहली १६ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार; प्रत्येक सामन्यासाठी 'इतकी' मॅच फी मिळणार

Virat Kohli Vijay Hazare Trophy: विराट कोहली दिल्ली संघाकडून विजय हजारे स्पर्धा खेळणार आहे

कसोटी आणि टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या स्टार भारतीय फलंदाज विराट कोहलीने मोठा निर्णय घेतला आहे. तो तब्बल १६ वर्षांनंतर मोठ्या स्थानिक स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सध्या सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान, दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहन जेटली यांनी स्टार फलंदाज विराट कोहलीबद्दल एक महत्त्वाची अपडेट शेअर केली आहे.

विजय हजारे ट्रॉफी २४ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत विराट दिल्लीच्या संघाकडून खेळण्यासाठी उपलब्ध असल्याचे त्याने दिल्ली क्रिकेट संघटनेला कळवले असल्याची माहिती आहे.

रोहन जेटली यांनी सांगितले, "विराटने विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्याची इच्छा दाखवली आहे. तो किती सामने खेळेल हे स्पष्ट नाही. पण त्याच्यामुळे दिल्लीच्या संघाचे वातावरण ताजेतवाने राहिल."

विराट कोहलीने विजय हजारे ट्रॉफीमधील शेवटचा सामना फेब्रुवारी २०१० मध्ये सर्व्हिसेसविरुद्ध खेळला होता. आता तो जवळजवळ १६ वर्षांनी लिस्ट ए डोमेस्टिक क्रिकेटमध्ये परतत आहे.

विराटला एका ODI सामन्यासाठी ६ लाख रुपये मानधन मिळते. पण विजय हजारे स्पर्धेत वरिष्ठ खेळाडूंच्या कोट्यानुसार, प्रत्येक सामन्यासाठी विराट कोहलीला ६०,००० रुपये मॅच फी मिळू शकते.