Virat Kohli Test Captaincy: पराभवानंतर द्रविडसोबत चर्चा, नंतर जय शाह यांना फोन; कोहलीनं 'असा' दिला राजीनामा! वाचा...

Virat Kohli Test Captaincy: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं कसोटी कर्णधारपदावरुन पायऊतार होण्याचा निर्णय ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केला. पण पडद्यामागे नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात...

भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यानं आज तडकाफडकी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देत असल्याचं ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केलं आणि सर्वांना धक्का दिला.

कोहलीनं असं तडकाफडकी निर्णय का घेतला अशी प्रतिक्रिया सर्वजण व्यक्त करत असले तरी वास्तविक परिस्थिती वेगळीच आहे. कोहलीनं आजचा निर्णय घेण्याआधी संपूर्ण तयारी केली होती.

कोहलीनं कर्णधारपदावरुन पायऊतार होण्याबाबत सर्वात आधी संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याला सांगितला होता. द्रविडसोबत चर्चा केल्यानंतर कोहलीनं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांना फोन केला होता. कोहलीनं जय शाह यांनाही कर्णधारपद सोडत असल्याची कल्पना दिली होती.

राहुल द्रविड आणि जय शाह यांना पूर्वकल्पना दिल्यानंतरच विराट कोहलीनं ट्विटरच्या माध्यमातून कर्णधारपदावरुन पायउतार होत असल्याचा निर्णय जाहीर केला.

सुत्रांच्या माहितीनुसार, द.आफ्रिका दौऱ्यात केपटाऊन कसोटीत भारतीय संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं. सामन्यानंतर कोहलीनं राहुल द्रविडची भेट घेतली आणि दोघांमध्ये बराच वेळ चर्चा देखील झाली. दोघांमध्ये मालिका पराभवाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. तर कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्याचं कोहलीनं राहुल द्रविडला सांगितलं

विराट कोहलीनं कर्णधारपद सोडण्याबाबत सहकारी खेळाडूंसोबत कोणतीही चर्चा केली नाही. थेट राहुल द्रविडकडे आपला निर्णय कळवला. त्यानंतर कोहलीनं शनिवारी दुपारी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना फोनवरुन संपर्क साधला.

कसोटी कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याचं कोहलीनं जय शाह यांना फोनवर सांगितलं. तर जय शाह यांनी कोहलीच्या निर्णयाचा स्वीकार केला. त्यानंतर कोहलीनं संध्याकाळी सार्वजनिकरित्या कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली.

बीसीसीआयचे खजिनदार अरुण धूमल यांनीही विराट कोहलीनं कर्णधारपदावरुन पायउतार होण्याबाबत जय शाह यांना कल्पना दिली होती असं सांगितलं. बोर्डानं विराट कोहलीच्या निर्णयाचा सन्मान केला आहे. जेव्हा कोहलीनं ट्वेन्टी-२० संघाचं कर्णधारपद सोडलं होतं. तेव्हा वर्ल्डकपपर्यंत थांबण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. पण कोहलीनं अंतिम निर्णय घेतला होता, असंही धूमल म्हणाले.