१५ षटकार, १५ चौकार; ८० चेंडूत १७५ धावा! फायनलमध्ये वैभव सूर्यवंशीने मोडले तब्बल ४ विक्रम

Vaibhav Suryavanshi World Record, U19 Final INDu19 vs ENGu19: अवघ्या १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने इंग्लंडच्या गोलंदाजांना धू धू धुतलं...

भारत आणि इंग्लंडच्या यांच्यात सुरू असलेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने तुफानी आघाडी घेतली.

सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने तुफान फटकेबाजी करत दीडशतकी खेळी केली. त्याने ८० चेंडूत १७५ धावांची खेळी साकारली. त्याच्या खेळीत १५ चौकार आणि १५ षटकार होते.

वैभवने ५५ चेंडूत शतक पूर्ण केले. त्यासोबतच १९ वर्षांखालील विश्वचषक अंतिम सामन्यात वैभवने सर्वात जलद शतक ठोकले. तर संपूर्ण स्पर्धेत त्याचे दुसरे सर्वात जलद शतक ठरले.

वैभव सूर्यवंशी हा १९ वर्षांखालील विश्वचषक अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने भारताच्या उन्मुक्त चंदचा १११ धावांचा विक्रम मोडला आणि विश्वविक्रम रचला.

१९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही त्याच्या नावावर झाला. त्याने १५ षटकार मारत मायकल हिलचा (१२) विक्रम मोडला.

वैभव सूर्यवंशी १९ वर्षांखालील विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला. त्याने स्पर्धेत ३० षटकार ठोकले. यादीत आफ्रिकेचा डेवाल्ड ब्रेव्हिस (१८) दुसरा तर फिन अँलन (१८) तिसरा आहे.