U19 World Cup: उदय भारताच्या जेतेपदाचा 'षटकार' मारणार? पृथ्वीसह विराटनंही जिंकलंय जग

U19 World Cup 2024: सध्या दक्षिण आफ्रिकेत आयसीसी अंडर-१९ विश्वचषक खेळवला जात आहे.

भारताच्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेला नमवून सहाव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. सध्या दक्षिण आफ्रिकेत आयसीसी अंडर-१९ विश्वचषक खेळवला जात आहे. मंगळवारी झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेला नमवून भारताने फायनलचे तिकिट मिळवले.

या सामन्यात भारतीय कर्णधार उदय सहारनने मॅचविनिंग खेळी केली. भारताचा जवळपास विजय निश्चित झाला होता अशा परिस्थितीत उदय बाद झाला. या विजयानंतर उदय सहारनने सांगितले की, ज्या कर्णधारांनी भारताला १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेले आहे, त्या कर्णधारांमध्ये सामील झाल्याचा मला आनंद आहे.

या स्पर्धेचा अंतिम सामना ११ फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहे. यातील विजयी संघ अंतिम सामन्यात भारताविरूद्ध खेळेल.

आतापर्यंत भारताने पाचवेळा अंडर-१९ विश्वचषक जिंकला असून यंदा देखील जेतेपद पटकावण्याची सुवर्णसंधी भारताच्या युवा ब्रिगेडकडे आहे. त्यामुळे उदय सहारन विश्वविजेता भारताचा सहावा कर्णधार बनणार का हे पाहण्याजोगे असेल.

पहिला अंडर-१९ विश्वचषक ३६ वर्षांपूर्वी १९८८ मध्ये खेळला गेला होता. तेव्हापासून ही स्पर्धा १४ वेळा आयोजित करण्यात आली आहे. यापैकी भारताने पाचवेळा विजेतेपद पटकावले आहे.

आता भारतीय संघाला सहाव्यांदा जेतेपद पटकावण्याची संधी आहे. टीम इंडियाने फायनल जिंकल्यास उदय सहारन मोहम्मद कैफच्या एलिट क्लबमध्ये सामील होईल.

भारताने २००० मध्ये पहिल्यांदा अंडर-१९ विश्वचषक जिंकला होता. क्रिकेट इतिहासातील हा तिसरा अंडर-१९ विश्वचषक होता, ज्यामध्ये भारतीय संघाचे नेतृत्व मोहम्मद कैफकडे होते. मग आठ वर्षांनंतर विराट कोहलीने कर्णधार म्हणून भारताला अंडर-१९ विश्वचषक चॅम्पियन बनवले

या क्लबमध्ये सामील होणारा उन्मुक्त चंद हा तिसरा भारतीय कर्णधार ठरला. उन्मुक्त चंदने अंडर-१९ विश्वचषकाच्या फायनलमध्ये शतक झळकावले होते. पण तो आता देश सोडून अमेरिकेत स्थायिक झाला आहे.

भारताने २०१८ मध्ये चौथ्यांदा अंडर-१९ विश्वचषक जिंकला. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ होता. पृथ्वी शॉ भारताच्या वरिष्ठ संघातून देखील खेळला आहे.

यश धुलच्या नेतृत्वाखाली भारताने २०२२ मध्ये पाचव्यांदा अंडर-१९ विश्वचषक जिंकला. सध्या यश धुलचा दिल्लीच्या रणजी संघात समावेश आहे.