क्रिकेटमधील या वादांमुळे गाजलं 2019 वर्ष!

2019चे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे या वर्षात क्रिकेटच्या मैदानावर घडलेल्या काही वादांवर आपण नजर टाकणार आहोत.

2 जानेवारीला करण जोहरच्या कॉफी विथ करण 6 या कार्यक्रमात भारतीय संघाचे दोन स्टार खेळाडू हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात हार्दिकने महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते आणि त्यानंतर त्याला लोकांच्या प्रचंड रोषाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर बीसीसीआयनं या दोघांवर निलंबनाची कारवाई केली होती. या दोघांनी माफी मागितल्यानंतर वादावर पडदा पडला होता.

वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात अंबाती रायुडूच्या जागी विजय शंकरला संधी दिल्यानं बरीच चर्चा रंगली. निवड समितीच्या या निर्णयावर रायुडूनं तीव्र शब्दात नाराजी प्रकट केली. त्यानं ट्विट केलं की,''वर्ल्ड कप सामना पाहण्यासाठी मला थ्री डी चष्मा ऑर्डर करावा लागेल.''

इंग्लंडमध्ये झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोजवरील बलिदान बॅजच्या चिन्हावर आक्षेप नोंदवण्यात आला होता. आयसीसीनंही याची गंभीर दखल घेतली होती आणि त्यामुळे पुढील सामन्यात धोनीला चिन्ह नसलेले ग्लोज घालावे लागले होते.

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातली वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल कोण विसरेल. या सामन्यात इंग्लंडला अखेरच्या षटकात 6 धावा हव्या होत्या. याच षटकात मार्टिन गुप्तीलनं केलेला थ्रो इंग्लंडच्या बेन स्टोक्सच्या बॅटवर आदळून चौकार गेला होता. ओव्हर थ्रोच्या या धावांमुळे सामना बरोबरीत सुटला होता आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला होता.

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातल्या सामन्यात एक वाद झाला होता. चेन्नईला तीन चेंडूवर विजयासाठी 7 धावा हव्या होत्या. पण, मैदानावरील पंचांनी नो बॉल दिला. त्यानंतर धोनीनं पंचांकडे धाव घेतली आणि राग व्यक्त केला.