वनडेत धावांचा रतीब घालणारा विराट कोहली कसोटीत 'दस नंबरी'!

2019या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 2455 धावांचा विक्रम टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या नाववर आहे. 2019 या कॅलेंडर वर्षात वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत कोहली 1377 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पण, कसोटीत तो उंबरठ्यावर राहिला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लॅबुश्चॅग्नेनं यंदाचं वर्ष गाजवलं. ऑसी संघात मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलताना त्यानं 2019मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यानं 10 कसोटींत 3 शतकं व 6 अर्धशतकांसह 1022 धावा केल्या आहेत. यंदाच्या कॅलेंडर वर्षात कसोटीत 1000 धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे.

एका वर्षांच्या बंदीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करणाऱ्या स्टीव्हन स्मिथनं या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. त्यानं अॅशेस मालिका गाजवताना 7 सामन्यांत 79.36च्या सरासरीनं 873 धावा केल्या आहेत. त्यात 3 शतकं व 3 अर्धशतकांचा समावेश आहे.

इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं 11 सामन्यांत 4 शतकं व 3 अर्धशतकांसह 774 धावा केल्या आहेत. त्यात 226 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

इंग्लंडचाच बेन स्टोक्स चौथ्या स्थानावर आहेत. हे वर्ष स्टोक्ससाठी स्वप्नवत राहिले. वर्ल्ड कप विजयाचा नायक ठरलेल्या स्टोक्सनं 10 सामन्यांत 772 धावा केल्या आहेत.

भारताचा मयांक अग्रवाल टॉप फाईव्हमध्ये आहे. त्यानेही मिळालेल्या संधीचं सोनं केलं. अग्रवालनं 8 सामन्यांत 754 धावा चोपल्या. त्यात तीन शतकं व 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

इंग्लंडचा रोरी बर्न्स यानं 11 सामन्यांत 731 धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर या क्रमवारीत सातव्या स्थानी आहे. एक वर्षांच्या बंदीनंतर त्यानंही कसोटी क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केले. त्यानं 8 सामन्यांत 646 धावा केल्या. त्यात त्रिशतकी खेळीचा समावेश आहे. त्यानं 335 धावांची नाबाद खेळी केली आहे.

टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेनं आपला फॉर्म पुन्हा मिळवला. त्यानं 8 सामन्यांत 71.33च्या सरासरीनं 642 धावा केल्या आहेत.

पाकिस्तानचा बाबर आझमनं वर्षातील अखेरच्या कसोटीत शतकी खेळी करत टॉप टेनमध्ये प्रवेश केला. त्यानं 6 सामन्यांत 68.44च्या सरासरीनं 616 धावा केल्या.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली या यादीत दहाव्या स्थानावर आहे. त्यानं 8 सामन्यांत 68च्या सरासरीनं 612 धावा केल्या आहेत.