Mumbai Indians ने डोक्यावर हात ठेवताच नशीब बदलले; सिंगापूरच्या फलंदाजासाठी ऑस्ट्रेलियाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघाचे दार उघडले!

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी झालेल्या मेगा ऑक्शनमधील माजी विजेत्या मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) स्ट्रॅटेजीने सर्वांनाच अवाक् केले...

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी झालेल्या मेगा ऑक्शनमधील माजी विजेत्या मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) स्ट्रॅटेजीने सर्वांनाच अवाक् केले... इशान किशनसाठी १५.२५ कोटी मोजल्यानंतर त्यांनी जोफ्रा आर्चरला ८ कोटींत आपल्या ताफ्यात घेतले. त्यानंतर त्यांनी उरलेली रक्कम अन्य खेळाडूंसाठी वापरली.

या दोन खेळाडूंना कोणत्याही परिस्थिती आपल्या संघात घ्यायचेच याच निर्धाराने मालक आकाश अंबानी लिलावासाठी आले होते. पण, या दोघांसह मुंबई इंडियन्सने आणखी काही खेळाडूंचे नशीब बदलले. त्यापैकी एक खेळाडू असा की ज्याच्यासाठी मुंबई इंडियन्सने अनपेक्षित ८.२५ कोटींची बोली लावली. आता मुंबई इंडियन्सने डोक्यावर हात ठेवल्यानंतर सिंगापूरच्या या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा दरवाजा उघडला आहे.

टीम डेव्हिड ( Tim David) हे नाव मागील काही वर्षांत ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पुढे आले आहे. बिग बॅश लीगच्या १०व्या पर्वात पर्थ स्कॉचर्स संघाच्या अंतिम ११ जणांमध्ये जागा मिळवण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागला. पण, त्यानंतर हॉबर्ट हरिकेन्स संघाने त्याला संधी दिली आणि मग डेव्हिडने मागे वळून पाहिले नाही.

त्यानं संघात फिनिशरची भूमिका चोख बजावली आणि BBLच्या मागील दोन पर्वात २८ षटकात खेचले. त्यानंतर त्याला कॅरेबियन प्रीमिअर लीग व पाकिस्तान सुपर लीगमध्येही खेळण्याची निवड झाली. IPL 2021मध्ये त्याला रॉयल चॅलेंजर्सने केवळ १ सामन्यात संधी दिली. पण, IPL 2022 Auction मध्ये पाच वेळच्या विजेत्या मुंबईने त्याचासाठी ८.२५ कोटी मोजले.

ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड ( Matthew Wade ) याने आता टीम डेव्हिड ऑस्ट्रेलियाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात खेळू शकतो, असे मत व्यक्त केले आहे. २५ वर्षांच्या डेव्हिडचे वडील रॉड हेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होते. त्यांनी १९९७च्या वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत सिंगापूर संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं. डेव्हिड सिंगापूरचा नागरिक आहे, परंतु त्याचे कुटुंबीय ऑस्ट्रेलियात पुन्हा राहायला गेले अन् डेव्हिड तिथेच लहानाचा मोठा झाला.

वेड म्हणाला,''ऑस्ट्रेलियाच्या संघात फिनिशरची कमी आहे. वेस्ट इंडिजचे खेळाडू ज्या ताकदीने खेळतात, तशी ताकद डेव्हिडकडे आहे. पोलार्ड, आंद्रे रसेलसारखे षटकार तो खेचतो. ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये असे खेळाडू मी फार कमी पाहिले आहेत. त्याने जर आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून धावांचा पाऊस पाडला. तर मला खात्री आहे की वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या ऑसी संघात त्याचा विचार नक्की होईल.''

डेव्हिडने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १५९.३९च्या स्ट्राईक रेटने १९०८ धावा केल्या आहेत आणि शिवाय त्याची ऑफ स्पिन गोलंदाजीही उपयुक्त ठरू शकते.

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, किरॉन पोलार्ड, जसप्रीत बुमराह, इशान किशन ( १५.२५ कोटी), डेवॉल्ड ब्रेव्हिस ( ३कोटी), बासील थम्पी ( ३० लाख), मुरुगन अश्विन ( १.६० कोटी), जयदेव उनाडकट ( १.३० कोटी), मयंक मार्कंडे ( ६५ लाख) , एन तिलक वर्मा ( १.७० कोटी), संजय यादव ( ५० लाख), जोफ्रा आर्चर ( ८ कोटी), डॅनिएल सॅम्स ( २.६० कोटी), टायमल मिल्स ( १.५० कोटी) ,टीम डेव्हिड ( ८.२५ कोटी), अनमोलप्रीत सिंग ( २० लाख), रमणदीप सिंग ( २० लाख), आर्यन जुयल ( २० लाख), रिले मेरेडिथ ( १ कोटी), मोहम्मद अर्षद खान ( २० लाख), हृतिक शोकीन ( २० लाख), फॅबियन अॅलन ( ७५ लाख), आर्यन जुनाल ( २० लाख), अर्जुन तेंडुलकर ( ३० लाख), राहुल बुद्धी ( २० लाख).