T20 World Cup: विश्वचषकातील या 5 सामन्यांनी जगाला दिला होता धक्का; ऑस्ट्रेलियाही झाली होती चितपट

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. चालू विश्वचषकात लहान संघानी आपली प्रतिभा दाखवन जगाचे लक्ष वेधले आहे. अलीकडेच पार पडलेल्या सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानचा अखेरच्या चेंडूवर पराभव करून सर्वांना धक्का दिला होता. अशा घटना यापूर्वी देखील घडल्या होत्या, ज्याचा फटका 2 वेळचा विश्वचॅम्पियन वेस्ट इंडिजला देखील बसला होता.

टी-20 विश्वचषकाच्या राउंड फेरीत नवख्या नामिबियाने श्रीलंकेचा पराभव केला होता. याशिवाय सुपर-12 मध्ये झिम्बाब्वेने पाकिस्तानला तर आयर्लंडने इंग्लंडला पराभवाची धूळ चारली होती. खरं तर राउंड फेरीच्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवून देखील नामिबियाचा संघ सुपर-12 मध्ये प्रवेश मिळवू शकला नाही. मात्र त्यांनी आशियाई किंग्ज श्रीलंकेचा पराभव करून जगाला धक्का दिला होता.

साल 2007च्या विश्वचषकामध्ये देखील अशीच घटना पाहायला मिळाली होती, त्या सामन्यात नवख्या झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा अखेरच्या सामन्यात 5 गडी राखून पराभव केला होता. झिम्बाब्वेचा स्टार गोलंदाज एल्टन चिगुम्बुराने ऑस्ट्रेलियाला तीन षटकांत 20 धावा देत तीन मोठे धक्के दिले, यादरम्यान त्याने मॅथ्यू हेडन आणि ॲडम गिलख्रिस्टलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. 139 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ब्रेडन टेलरने नाबाद 60 धावा केल्या, ज्याच्या जोरावर झिम्बाब्वेने 20 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रोमहर्षक विजय मिळवला.

टी-20 विश्वचषकाच्या 2009च्या हंगामात नेदरलॅंड्सने इंग्लंडचा पराभव करून आपल्या खेळीची जगाला दखल घ्यायला लावली होती. इंग्लंड आणि नेदरलँड्स यांच्यातील स्पर्धेतील पहिला सामना लॉर्ड्सवर खेळला गेला ज्यात नवख्या संघाने शेवटच्या चेंडूवर इंग्लिश संघाचा पराभव केला. या सामन्यात नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर इंग्लंडने 163 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलॅंड्सची निराशाजनक सुरूवात झाली होती, मात्र टॉम डी ग्रोथ (49), पीटर बोरेन (30) आणि रायन टेन डोशेट (22) यांनी नेदरलँड्सकडून चांगली खेळी केली आणि इंग्लंडला पराभवाची धूळ चारली.

2014च्या विश्वचषकात पुन्हा एकदा नेदरलॅंड्स आणि इंग्लंड यांच्यात सामना झाला. यावेळी इंग्लंडने नाणेफेक जिंकून नेदरलॅंड्सला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. वेस्ली बरेसी (48) आणि स्टीफन मायबर्ग (39) यांच्या खेळीच्या जोरावर नेदरलँड्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 133 धावा केल्या. इंग्लंडसाठी हे आव्हान सोपे होते पण नेदरलँडच्या गोलंदाजांनी इंग्लिश फलंदाजांना आरसा दाखवला. लोगान व्हॅन बीकने 2 षटकांत 9 धावांत 3, तर मुदस्सर बुखारीने 12 धावांत 3 बळी घेतले. इंग्लिश संघ इतका दबावाखाली होता की त्यांचे दोन फलंदाज धावबाद झाले आणि संपूर्ण संघ अवघ्या 88 धावांवर गारद झाला. नेदरलँड्सने हा सामना 45 धावांनी जिंकला आणि इतिहास रचला.

2016 मध्ये विश्वचषकाच्या सहाव्या हंगामात वेस्ट इंडिजने विश्वचषकाचा किताब पटकावला होता. या स्पर्धेत विश्वविजेत्या विंडिजच्या संघाला केवळ एक सामना गमवावा लागला होता. लक्षणीय बाब म्हणजे वेस्ट इंडिजच्या संघाला नवख्या अफगाणिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. अफगाणिस्तानने स्पर्धेतील 30व्या सामन्यात कॅरेबियन संघाचा 6 धावांनी पराभव केला होता. या सामन्यात अफगाणिस्तानने नजीबुल्ला झाद्रानच्या 48 धावांच्या जोरावर 123 धावा केल्या होत्या. त्यानंतर बलाढ्य वेस्ट इंडिजचा संघ 20 षटकात केवळ 117 धावा करत गारद झाला होता.

सध्या सुरू असलेल्या 2022च्या विश्वचषकात देखील असाच एक सामना पाहायला मिळाला. ग्रुप बी मधील झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यात लढत झाली. या सामन्यात पाकिस्तानचा अखेरच्या चेंडूवर पराभव झाला. पाकिस्तानला विजयासाठी अवघ्या 131 धावांचे आव्हान होते, ज्याचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघ 20 षटकांत 8 बाद केवळ 129 धावा करू शकला. खरं तर याच पराभवामुळे पाकिस्तानी संघ विश्वचषकातून बाहेर झाला आहे. झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाने सर्वाधिक 3 बळी पटकावून पाकिस्तानला धूळ चारली.