Virat Kohli vs BCCI वादाला मिळाली नवी फोडणी; बीसीसीआयनं विराट कोहलीच्या सर्व दाव्यांवर 'प्रत्यारोपां'ची शाब्दिक तलवार चालवली

Virat Kohli vs BCCI - डिसेंबर २०२१ हा महिना भारतीय क्रिकेटला ढवळून काढणारा ठरला. भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा वाद या महिन्यात गाजताना दिसतोय.

डिसेंबर २०२१ हा महिना भारतीय क्रिकेटला ढवळून काढणारा ठरला. भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा वाद या महिन्यात गाजताना दिसतोय. विराट कोहलीनं ९० मिनिटांच्या कॉलअखेरीस वन डे कर्णधारपदावरून हटवल्याचे सांगितल्याचा दावा केला, शिवाय त्यानं BCCI अध्यक्ष सौरव गांगुली याच्या बरोबर विरुद्ध विधान करून मोठी खळबळ माजवली.

विराटला ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडू नकोस, अशी विनंती केल्याचा दावा गांगुलीनं केला होता, परंतु विराटनं अशी कोणतीच विनंती कुणी केली नसल्याचे सांगून 'दादा'ला खोट्यात पाडलं. २४ तासानंतर गांगुलीनं या प्रकरणात माझ्याकडे बोलण्यासारखे काहीच नाही, BCCI हे प्रकरण योग्यरितीनं हाताळतील, असे विधान केलं.

आता बीसीसीआयच्या सूत्रांनी Times Now ला दिलेल्या मुलाखतीत विराट कोहलीच्या प्रत्येक दाव्यावर 'प्रत्यारोपां'ची शाब्दिक तलवार चालवली आहे. बीसीसीआयला वन डे व ट्वेंटी-२० संघांसाठी दोन वेगवेगळे कर्णधार नकोच होते. त्यामुळे जेव्हा विराटनं सप्टेंबरमध्ये ट्वेंटी-२० कर्णधारपद सोडण्याचे जाहीर केलं, तेव्हाच हे ठरलं होतं.

विराट कोहलीच्या दाव्यांवर बोलताना BCCIच्या सूत्रानं सांगितलं की, विराट कोहलीला BCCIशी काही प्रॉब्लेम आहे का हे माहीत नाही, परंतु बोर्डाला कसोटी कर्णधाराबाबत काही इश्यू आहेत. कोहलीचा सहकाऱ्यासोबत संवाद नसायचा आणि सामन्यानंतर तर तो एकांतवासातच जायचा. तो निवड समितीसोबतही समन्वय व संवादही साधत नसायचा. बीसीसीआयला कर्णधारपदाचा निर्णय घ्यायचा होता. मागील चार महिन्यांत दोन कर्णधार ठेवायचे की नाही यावर चर्चा झाली. बीसीसीआयला वन डे व ट्वेंटी-२० संघासाठी एकच कर्णधार असावा, असे वाटायचे.

तुम्ही कामगिरी करा अन् संघात कायम राहा, हे इतकं सोपं आहे. बीसीसीआयची ही फिलोसोफी आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही, त्यामुळे त्याची कर्णधारपदावरून हकालपट्टी आश्चर्यचकित करणारी नक्कीच नाही. कोहलीही हे जाणून होता, असेही बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.

''आयसीसी स्पर्धा न जिंकल्यामुळे त्याला वन डे कर्णधारपदावरून काढण्यात आले. त्यामुळे हा निर्णय योग्य की अयोग्य, यावर चर्चाच होऊ शकत नाही. हा तर्कशुद्ध निर्णय होता. त्यात बीसीसीआयवर आरोप करण्याचं कारणच नाही. कोणाला कर्णधारपदावर ठेवायचे अन् कोणाला काढायचे हे निवड समितीचं काम आहे,''असंही त्यांनी स्पष्ट केलं.