४९ चौकार, ४ षटकार! पृथ्वी शॉची ऐतिहासिक खेळी; ३२ वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम, KL Rahul लाही टाकले मागे

पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईकडून सलामीला येताना ऐतिहासिक खेळी केली.

पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईकडून सलामीला येताना ऐतिहासिक खेळी केली. आसामविरुद्धच्या सामन्यात पृथ्वीने ४९ चौकार व ४ षटकारांचा पाऊस पाडताना ५३ चेंडूंत २३२ धावा चोपल्या. त्याच्या ३७९ धावांच्या वादळी खेळीला आसामचा स्टार अष्टपैलू रियान परागने ब्रेक लावला, परंतु मुंबईकराने मोठमोठे विक्रम मोडले.

सामन्याच्या पहिल्याच दिवशी पृथ्वी शॉ आक्रमक फलंदाजी करत २४० धावा करून नाबाद राहिला. दुसऱ्या दिवशीही तो फॉर्ममध्ये दिसला आणि अमीनगाव क्रिकेट मैदानावर त्याने झटपट त्रिशतक झळकावले. शॉने ३२६ चेंडूत ४१ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने त्रिशतक पूर्ण केले.

शानदार फलंदाजी करणाऱ्या पृथ्वी शॉला ४०० धावांचा टप्पा पार करण्यात थोडक्यात अपयश आले. पृथ्वी शॉला आसामच्या रियान परागने पायचीत केले आणि तो ३८३ चेंडूंत ४९ चौकार आणि चार षटकारांसह ३७९ धावा करून बाद झाला. ३७९ धावा करणारा पृथ्वी शॉ हा रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला.

मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा तो चौथा युवा फलंदाज ठरला. हा विक्रम वासिम जाफरच्या नावावर आहे. त्याने १९९६ मध्ये सौराष्ट्रविरुद्ध १८ वर्ष व २६२ दिवसांचा असताना त्रिशतक झळकावले होते. त्यानंतर सर्फराज खान ( २२ वर्ष व ८९ दिवस वि. उत्तर प्रदेश, २०२०), रोहित शर्मा ( २२ वर्ष व २२९ दिवस वि. गुजरात, २००९) यांचा क्रमांक येतो. पृथ्वीने २३ वर्ष व ६३ दिवसांचा असताना ही कामगिरी केली.

रणजी करंडकमध्ये त्रिशतक झळकावण्यासोबतच पृथ्वी शॉने एक वेगळा विक्रम नावावर केला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतक, ट्वेंटी-२० सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शतक अन् 50 षटकांच्या लिस्ट ए विजय हजारे ट्रॉफीमध्ये शतक, असे भारतातील तिन्ही स्थानिक स्पर्धांमध्ये दबदबा राखणारा तो एकमेव भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान त्रिशतक झळकावणाऱ्या टॉप सहा फलंदाजांत पृथ्वी शॉने स्थान पटकावले. वीरेंद्र सेहवाग ( २७८ चेंडू वि. दक्षिण आफ्रिका, २००७/०८) अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर केदार जाधव ( २८५ चेंडू वि. उत्तर प्रदेश, २०१२/१३), प्रणॉय बिस्त ( २९१ चेंडू वि. सिक्कीम, २०१८/१९), रोहित शर्मा ( ३१२ चेंडू वि. गुजरात, २००९/१०), रिषभ पंत ( ३२० चेंडू वि. महाराष्ट्र, २०१६/१७) आणि पृथ्वी शॉ ( ३२६ चेंडू वि. आसाम, आज) असा क्रमांक येतो.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये भारतीय सलामीवीराने केलेली ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. पृथ्वीने आज ३७९ धावा केल्या. त्याने समित गोहेल याचा ३५९* धावांचा विक्रम मोडला. स्वप्निल गुगाळे ( ३५१*धावा), प्रशांत चोप्रा ( ३३८) आणि लोकेश राहुल ( ३३७ धावा) यांनाही पृथ्वीने मागे टाकले.

रणजी करंडक स्पर्धेत सर्वोत्तम वैयक्तिक खेळीत पृथ्वी शॉने दुसरे स्थान पटकावले. त्याने संजय मांजरेकर यांचा १९९१ साली नोंदवलेला नाबाद ३७७ धावांचा विक्रम मोडला. बीबी निंबाळकर ( महाराष्ट्र वि. काठिवार १९४८) यांनी ४४३* धावा केल्या होत्या.