तुम्ही नेहमी त्यांच्या 'गन पॉईंट'वर असता, रवी शास्त्रींनी पुकारलं बंड; बीसीसीआयवर केले गंभीर आरोप?

Indian Team Coach: आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडियात दोन महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळणार आहेत.

Indian Team Coach: आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडियात दोन महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळणार आहेत. एक विराट कोहली वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदावर नसेल आणि दुसरा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) हेही पदावरून पायउतार होत आहेत.

बीसीसीआयनं नव्या मुख्य प्रशिक्षकाचा शोध सुरू केला आहे. बीसीसीआयनं रवी शास्त्री यांना एक महिन्याच्या मुदतवाढीचा प्रस्ताव ठेवला होता, परंतु त्यांनी स्पष्ट नकार दिला. आता त्यांनी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदावर राहणे किती तणावाचे काम आहे, याबाबत स्पष्ट मत मांडून बीसीसीआयविरोधात बंड पुकारले आहे?

The Guardian ला रवी शास्त्री यांनी मुलाखत दिली आणि त्यात त्यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदावर कायम राहणार नसल्याचे स्पष्ट केले. मुख्य प्रशिक्षक म्हणून घवघवीत यश मिळवले आणि त्यामुळे आणखी काही काळ या पदावर राहायचे नाही, असे ते म्हणाले.

''मला जे हवं होतं ते मी मिळवलं. पाच वर्ष कसोटी क्रिकेटमध्ये नंबर वन, ऑस्ट्रेलियात दोन कसोटी मालिका विजय, इंग्लंडविरुद्ध विजय. त्यामुळे आता आम्ही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला, तर तो माझ्यासाठी सोने पे सुहागा असा क्षण असेल,''असे ते म्हणाले.

द्विदेशीय ट्वेंटी-२० मालिका कमी व्हायला हव्यात. फुटबॉलमध्ये प्रीमिअर लीग, स्पॅनिश लीग, इटालियन लीग आणि जर्मन लीग आहेत. या सर्व लीगमधील क्लब चॅम्पियन्स लीगमध्ये एकत्र खेळतात. त्यामुळे फार कमीच द्विदेशीय फुटबॉल मैत्रीपूर्ण सामने होतात. राष्ट्रीय संघ फक्त वर्ल्ड कप किंवा वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत खेळतात आणि युरोपियन चॅम्पियनशीप, कोपा अमेरिका आणि दी आफ्रिका कप मध्ये खेळतात. याच मार्गानं ट्वेंटी-२० क्रिकेटनं पुढे जायला हवं, असे शास्त्री म्हणाले.

कोरोना आहे की नाही, याची त्यांना पर्वा नाही. त्यांना फक्त विजय हवाय आणि धावा करायला हव्यात. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनणे म्हणजे ब्राझिल किंवा इंग्लंडच्या फुटबॉल संघाचे प्रशिक्षक बनण्यासारखे आहे. तुम्ही नेहमी गन पॉईंटवर असता, असे म्हणून शास्त्रींनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले, सहा महिने तुमची कामगिरी उल्लेखनीय होते अन् त्यानंतर एकदा ३६ धावांवर गारद झाल्यावर तुम्हाला जाब विचारला जातो. त्यानंतर तुम्हाला लगेच विजय मिळवावा लागतो. अन्यथा ते तुमचे लचके तोडायला सुरुवात करतात. मग तुम्हाला लपत फिरावे लागते.