MS Dhoni Production House: महेंद्र सिंग धोनीचा आता फिल्मी जगतात जलवा, लाँच केलं प्रोडक्शन हाऊस

MS Dhoni Production House: आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आता फिल्मी विश्वावर अधिराज्य गाजवण्याची तयारी केली आहे.

MS Dhoni Production House: आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आता फिल्मी विश्वावर अधिराज्य गाजवण्याची तयारी केली आहे. त्याचा अद्याप हिरो बनण्याचा कोणताही विचार नसला तरी त्याने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस मात्र सुरू केले आहे.

माहीने त्याच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव 'धोनी एंटरटेनमेंट' ठेवले आहे. LetsCinema ने रविवारी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. त्याने एक फोटो देखील शेअर केला ज्यामध्ये धोनीही दिसत आहे आणि त्याच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव देखील आहे.

धोनी आता फिल्मी दुनियेत येण्यासाठी सज्ज असल्याची बातमी बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. रिपोर्ट्समध्ये असा दावाही करण्यात आला होता की, धोनी साऊथचा सुपरस्टार थालापथी विजयसोबत एक चित्रपट करणार आहे. एवढेच नाही तर धोनी या चित्रपटात कॅमिओ देखील करू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. धोनीने स्वतः साऊथ सुपरस्टार विजयला फोन करून हा चित्रपट करण्यास सांगितले आहे.

या सर्व बातम्यांदरम्यान आता धोनीने त्याचे प्रोडक्शन हाऊसही लाँच केले आहे. म्हणजेच, या रिपोर्ट्समध्ये केलेल्या दाव्यांपैकी एक गोष्ट खरी असल्याचे दिसून येत आहे. आता धोनी मोठ्या पडद्यावर कधी दिसणार हेही पाहावं लागणार आहे.

धोनीच्या प्रोडक्शन हाऊसच्या जे पोस्टर समोर आले आहे त्यात माही तीन भाषांमध्ये त्याचे चित्रपट बनवणार असल्याची माहिती समोर आली आहे. या भाषा तमिळ, तेलगू आणि मल्याळम आहेत. तसे, धोनी 2008 पासून आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे. त्यामुळे धोनी दक्षिणेतही खूप प्रसिद्ध आहे. माहीला थाला नावानेही संबोधले जाते.

धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. परंतु तो आयपीएलमध्ये खेळताना दिसत आहे. तो अजूनही चेन्नई संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे. आयपीएल 2023 नंतर धोनी या लीगमधून निवृत्त होऊ शकतो, असा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.