T20I: अभिषेक शर्मा नव्हे तर, रोहित- विराट सर्वाधिक वेळा शून्यावर आऊट; किती वेळा झाले बाद?

भारतीय संघ सध्या २०२६ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत आपल्या विजयाचा धडाका कायम ठेवून आहे. मात्र, या विजयी प्रवासात युवा फलंदाज अभिषेक शर्माचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. ज्या अभिषेककडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, तो या स्पर्धेत सलग तीन सामन्यांत आपले खातेही उघडू शकला नाही. या खराब कामगिरीमुळे टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत अभिषेकची नोंद झाली.

रोहित शर्मा: भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा या नकोशा विक्रमात पहिल्या क्रमांकावर आहे. रोहितने १५९ टी-२० सामन्यांतील १५१ डावांमध्ये ३२.०५ च्या सरासरीने ४२३१ धावा केल्या आहेत. मात्र, तब्बल १२ वेळा तो एकही धाव न काढता बाद होऊन माघारी परतला आहे.

विराट कोहली: जगातील महान फलंदाजांपैकी एक असलेला विराट कोहली या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने १२५ सामन्यांतील ११७ डावांमध्ये ४१८८ धावा केल्या आहेत. धावांचा डोंगर उभा करणाऱ्या विराटच्या नावावर ७ वेळा शून्यावर बाद होण्याची नोंद आहे.

संजू सॅमसन: २०२६ च्या विश्वचषक संघाचा भाग असलेला यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. संजूने आतापर्यंत ५० डावांमध्ये फलंदाजी करताना ११०० धावा केल्या आहेत, पण तो सुद्धा विराटप्रमाणेच ७ वेळा शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.

अभिषेक शर्मा: युवा तुफान अभिषेक शर्माने अत्यंत कमी कालावधीत या यादीत चौथे स्थान गाठले आहे. त्याने आतापर्यंत ४० डावांत १२९७ धावा केल्या आहेत. मात्र, चालू विश्वचषकातील खराब फॉर्ममुळे त्याच्या खात्यात आता ६ 'डक' जमा झाले आहेत. सुपर ८ सामन्यांपूर्वी त्याचा हा फॉर्म भारतासाठी चिंतेची बाब आहे.

सूर्यकुमार यादव: टीम इंडियाचा सध्याचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव या यादीत अभिषेक शर्मासह संयुक्तपणे पाचव्या क्रमांकावर आहे. सूर्याने १०२ डावांत ३१९२ धावा केल्या आहेत, पण तो ही ६ वेळा शून्यावर बाद झाला आहे.