T20 world Cup, Afg vs Pak : अफगाणिस्तानचा झाला पराभव, पण रशिद खाननं इतिहास रचून मलिंगा, शकिबचा विक्रम मोडला

ICC T20 World Cup 2021 Afghanistan vs Pakistan : पाकिस्तानला मिळाला सलग तिसरा विजय. अफगाणिस्तानच्या राशिद खाननं रचला इतिहास.

राशिद खाननं उत्तम गोलंदाजी करून सामना अटीतटीचा बनवला, परंतु पुन्हा एकदा आसिफ अली ( Asif Ali) पाकिस्तानसाठी धावला. त्यानं एकाच षटकात ४ षटकार खेचून पाकिस्तानला सलग तिसरा विजय मिळवून दिला.

अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू रशिद खान यानं पाकिस्तान विरोधातील T20 सामन्यात इतिहास रचला. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० विकेट्स घेणारा तो पहिला गोलंदाज बनला आहे. यापूर्वी केवळ ३ गोलंदाजांनी हा विक्रम केला होता.

रशिदनं ५३ T20 सामन्यांमध्ये आपल्या १०० विकेट्स पूर्ण केल्या. तर मलिंगानं ७६ सामन्यांमध्ये, टिम साउदीनं ८२ आणि शाकिब अल हसननं ८३ सामन्यांमध्ये आपल्या १०० विकेट्स पूर्ण केल्या होत्या. राशिदनं पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद हफिज याची विकेट घेत T20 सामन्यांमध्ये आपल्या विकेट्सचं शतक पूर्ण केलं.

रशिदनं पाकिस्तानविरोधातील सामन्यात चार षटकांमध्ये २६ धावा देत २ विकेट्स घेतल्या. सामन्यात अफगाणिस्ताननं पाकिस्तानच्या नाकी नऊ आणले होते. परंतु या सामन्यात अफगाणिस्तानला पाच विकेट्सनं पराभव पत्करावा लागला होता.

ICC T20 World Cup 2021 Afghanistan vs Pakistan updates : अफगाणिस्तान आणि सेमी फायनल यांच्या मार्गात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) उभा राहिला. अफगाणिस्ताननं ठेवलेल्या १४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. पण, बाबर व फाखर जमान यांनी डाव सावरला.

राशिदनं ५३ T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०० विकेट्स घेतल्या आहेत. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चार वेळा ४ विकेट्स आणि दोन वेळा ५ विकेट्स घेण्याचाही विक्रम त्यानं केला आहे. T20 सामन्यांमध्ये रशिदच्या पुढे आता शाकिब अल हसन आणि लसीथ मलिंगा आहेत.

शाकिबनं ९४ सामन्यांमध्ये ११७ आणि मलिंगानं ८४ सामन्यांमध्ये १०७ विकेट्स घेतल्या आहेत. T20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी इकॉनॉमी रेट असलेला तो दुसरा गोलंदाज आहे. त्याचा इकॉनॉमी रेट ६.१८ इतका आहे.

अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हझरतुल्लाह झझाई (०) व मोहम्मद शाबजाज (८) यांना अुक्रमने इमाद वासीम व शाहिन यांनी बाद केलं. त्यानंतर टप्प्याटप्पानं अफगाणिस्तानच्या विकेट्स पडतच होत्या. पण, त्यांचा प्रत्येक फलंदाज आक्रमक पवित्र्यातच होता.

पाकिस्तानची सुरूवात साजेशी झाली नाही. मोहम्मद रिझवाद ८ धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार बाबर आजम आणि फाखर जमान यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. मुजीब उर रहमाननं अफगाणिस्तानला पहिले यश मिळवून दिले. १२ धावांवर पहिली विकेट पडूनही बाबर ( Babar Azam) खेळपट्टीवर अडून बसला. बाबर व जमान यांनी पाकिस्तानला ११ षटकांत १ बाद ७५ धावांपर्यंत मजल मारून दिली आहे. राशीद खानच्या गोलंदाजीवर DRSमुळे जीवदान मिळालेल्या बाबरनं अर्धशतकी खेळी केली. पण, फाखर २५ चेंडूंत ३० धावांवर बाद झाला. मोहम्मद हाफिज ( १०) पुन्हा अपयशी ठरला.

१७व्या षटकात राशिदच्या गोलंदाजीवर बाबरला जीवदान मिळालं, नवीननं त्याचा झेल सोडला. पण, त्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर राशिदनं त्रिफळा उडवत ५१ धावा करणाऱ्या बाबरला माघारी पाठवलं. पुढच्याच षटकात नवीन-उल-हकनं सोडलेल्या झेलची वसूली केली आणि शोएब मलिकची ( १९) महत्त्वाची विकेट घेतली. पाकिस्तानला १२ चेंडूंत २४ धावांची गरज होती आणि आसिफ फलीनं १९व्या षटकात करीम जनतला चार खणखणीत षटकार खेचून सर्व दडपण झुगारून लावलं आणि पाकिस्तानला ५ विकेट्स व ६ चेंडू राखून जिंकवलं. आसिफनं ७ चेंडूंत २५ धावा केल्या.