T20 World Cup 2022: या 7 बड्या क्रिकेटपटूंची भासणार उणीव; टी-20 विश्वचषकापासून राहणार वंचित

ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर 16 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ज्यामध्ये एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. या विश्वचषकापूर्वी काही स्टार खेळाडूंना दुखापत झाली असून त्यामुळे त्यांना विश्वचषकाला मुकावे लागले आहे.

भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर झाला आहे. बुमराहने मोठ्या कालावधीनंतर ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेतून पुनरागमन केले होते. मात्र दोन सामने खेळल्यानंतर त्याला दुखापतीमुळे बाहेर व्हावे लागले. तो आशिया चषकात देखील भारतीय संघाचा हिस्सा नव्हता. बीसीसीआयने अद्याप त्याच्या रिप्लेसमेंटवर कोणतेही नाव जाहीर केले नाही. खरं त्याच्या जागी मोहम्मद शमी किंवा दीपक चहर यांची निवड होण्याची दाट शक्यता आहे.

एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमधील सर्वात घातक फलंदाजांपैकी एक मानला जाणारा इंग्लंडचा जेसन रॉय 2022चा देखील टी-20 विश्वचषक खेळणार नाही. खराब फॉर्ममुळे रॉयच्या मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत, ज्यामुळे तो प्रथम संघाबाहेर आणि नंतर टी-20 विश्वचषकातूनही बाहेर पडला. पाकिस्तानविरुद्धच्या 7 सामन्यांच्या टी-20 मालिकेत इंग्लंडने रॉयच्या जागी ॲलेक्स हेल्सला संधी दिली आणि हेल्सने ही संधी न गमावता संधीचे सोने केले होते.

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल देखील विश्वचषकात चौकार आणि षटकार मारताना दिसणार नाही. जेसन रॉयप्रमाणेच रसेललाही खराब फॉर्ममुळे विश्वचषकाला मुकावे लागले आहे. खराब फॉर्मच्या कारणामुळे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने रसेलला विश्वचषक संघात स्थान दिलेले नाही. त्यामुळे टी-20 मधील एक घातक अष्टपैलू खेळाडू विश्वचषकात पाहायला मिळणार नाही.

इंग्लंडच्या संघाचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो देखील या विश्वचषकात खेळताना दिसणार नाही. बेअरस्टोची इंग्लंडच्या टी-20 विश्वचषक संघात निवड झाली होती, परंतु संघ जाहीर झाल्यानंतर तो गोल्फ खेळताना जखमी झाला आणि संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला. बेअरस्टोच्या जागी सलामीवीर ॲलेक्स हेल्सचा इंग्लंडच्या संघात समावेश करण्यात आला.

वेस्ट इंडिजचा फलंदाज शिमरॉन हेटमायर देखील विश्वचषकाच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. लक्षणीय बाब म्हणजे विमान चुकले म्हणून त्याला स्पर्धेला मुकावे लागले आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने त्याला दोनदा ऑस्ट्रेलियाचे विमान चुकवल्यामुळे टी-20 विश्वचषक संघातून वगळले आहे. त्याच्या जागी 34 वर्षीय फलंदाज शामराह ब्रूक्सचा संघात समावेश करण्यात आला आहे.

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा गुडघ्याच्या दुखापतीमुळे आधीच विश्वचषकातून बाहेर झाला आहे. जडेजा मागील मोठ्या कालावधीपासून गुडघ्याच्या समस्येचा सामना करत होता. आशिया चषक 2022 च्या मध्यातूनच तो संघाबाहेर झाला होता, त्यानंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली. जडेजा बाहेर पडल्यानंतर अक्षर पटेलला संघात संधी मिळाली आहे, त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टी-20 मालिकेत शानदार प्रदर्शन केले होते.

दुखापतीमुळे आणखी एक स्टार खेळाडू टी-20 विश्वचषकातून बाहेर झाला आहे. इंग्लंडच्या संघाचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर देखील विश्वचषकाला मुकणार आहे. आर्चर सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकाला मुकला आहे. कोपराच्या दुखापतीमुळे आर्चर 2021 चा आयपीएल हंगाम खेळू शकला नव्हता. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने टी-20 विश्वचषकापूर्वी आर्चर फिट होण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु तो वेळेत फिट न झाल्याने आता तो पुन्हा एकदा टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे.